दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी असलेल्या ‘शिक्षक दिना’ निमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले लिखित ‘अभंग तरंग’ या काव्यसंग्रहातील ‘आदर्श शिक्षक’ हा अभंग येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
आदर्श शिक्षक
आदर्श शिक्षक । ज्ञानाचा सुगंध ।
मंदिरात गंध । चोहिकडे ॥१॥
शाळा आणि फळा । गुरुंचे जीवन ।
संस्कार पावन । होत जाती ॥ २ ॥
अभ्यासाचे तंत्र । सांगतसे गुरू ।
अभ्यास तो सुरू । नियमित ॥ ३ ॥
सर्व विद्यार्थ्यांना । समान वर्तन ।
विद्यार्थ्यांचे मन । आनंदित ॥ ४ ॥
सुसंस्कार देई । शिक्षक आदर्श ।
विद्यार्थी सहर्ष । घडतसे ॥ ५ ॥
आदर्श गुरुंचा । ध्यासच मंथन ।
वाचन चिंतन । करितसे ॥ ६ ॥
ग्रंथ वाचनाचे । मोल सांगे गुरू ।
वाचन ते सुरू । विद्यार्थ्यांचे ॥ ७ ॥
आदर्श शिक्षक । प्रकाश विद्येचा ।
लय तिमिराचा । करितसे ॥ ८ ॥
ज्ञान मंदिरात । आदर्श शिक्षक ।
तेजस्वी रक्षक । संस्कृतीचे ॥ ९ ॥
आदर्श गुरुंना । करितो प्रणाम ।
माझा हा सलाम । गुरुजींना ॥ १० ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
आदर्श उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व अभंगकार, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील असंख्य अश्या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






