सावित्रीबाई फुलेंनी महिलांना सन्मानाने जगण्याचा दिला विचार व आत्मविश्वास – प्रा. अरुण बुंदेले; कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे कीर्ती म्हसकर व कुंजल म्हसकर यांचा सत्कार

SHARE:

अमरावती – “आजचा हा सत्काराचा क्षण अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. ‘सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य आणि आजची महिला’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सौ. कीर्ती निलेश म्हसकर यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल कु. कुंजल म्हसकर या गुणवंत विद्यार्थिनीचे अभिनंदन करतो. बारावीनंतर लॉ ला ऍडमिशन घेऊन कुंजल एक आदर्श वकील – न्यायाधीश बनेल ही सदिच्छा व्यक्त करतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, समाजाचा छळ सोसून स्त्री शिक्षणाची जी ज्योत पेटवली, तिचेच फळ आज आपण चाखत आहोत. सावित्रीबाईंनी फक्त अक्षरे दिली नाहीत, तर महिलांना सन्मानाने जगण्याचा विचार आणि आत्मविश्वास दिला. सौ. कीर्ती म्हसकर यांनी आपल्या निबंधातून सावित्रीबाईंचे विचार आणि आजच्या आधुनिक महिलेसमोरील आव्हाने यांचा जो सुरेख मेळ घातला आहे, तो वाखाणण्याजोगा आहे. आजची महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे, पण त्याच वेळी तिच्यावर सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारीही आहे. कीर्तीताईंनी आपल्या लेखनातून हाच विचार समाजासमोर मांडला आहे.अशा वैचारिक स्पर्धा आयोजित करणारे प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांचे मी अभिनंदन करतो. या सत्काराच्या निमित्ताने दोन्ही गुणवंतांना त्यांच्या पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा! सावित्रीबाईंच्या विचारांची मशाल अशीच तेवत राहो, हीच सदिच्छा!” असे विचार साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

 

 

 

           ते स्थानिक जेवड नगर येथील सुखशांती वृद्‌धाश्रम येथे कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित दि. २३ सप्टेंबर २०२६ ला राज्यस्तरीय ‘सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य आणि आजची महिला’ या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सौ. कीर्ती निलेश म्हसकर व बारावीची गुणवंत विद्यार्थ्यांनी कु. कुंजल म्हसकर यांच्या सत्काराच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी पदावरून विचार व्यक्त करीत होते. 

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी नागपूर येथील माजी प्रशासकीय अधिकारी श्री. कालीदास म्हसकर, साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बुंदेले, पोलीस पाटील सौ. कविता नरेंद्र पाचघरे होते. 

       सौ. कीर्ती निलेश म्हसकर यांचा निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल व कुंजल म्हसकरचा वर्ग बारावी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ, शाल,विचार पुष्प,सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुख शांती वृद्धाश्रमास अन्नदान आणि डायनिंग टेबल भेट देऊन वृद्ध माता-पिता यांचे औक्षण करण्यात आले आणि त्यांना डॉ.प्रवीण बनसोड लिखित विचार पुष्प सन्मानपूर्वक भेट देण्यात आले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे दिले बळ – समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड

        अध्यक्षीय भाषणातून समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानच्या समाजसेवी कार्याबद्दल अभिनंदन करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व जोतीराव फुले यांनी महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिल्यामुळेच आजच्या सकल महिलांना स्वाभिमानाने जगण्याचे आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे बळ मिळाल्याचे सांगितले!”

      याप्रसंगी पोलीस पाटील कविता नरेंद्र पाचघरे, सुख शांती वृद्‌धाश्रमाच्या सौ. ज्योती रेखाते, श्री. कालीदास म्हसकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माळी समाज ऋणानुबंधचे श्री. गोविंद फसाटे, राम‌लाल खैरे, महिला आघाडीच्या सौ. सुनंदा बनसोड, एन. पी. पाचघरे, एन. के. म्हसकर, अक्षय रेखातेसह वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा