तुका म्हणे, शोभा सांगे…
संत तुकारामांच्या गुरू परंपरेविषयी निश्चित स्वरूपाची माहिती उपलब्ध नाही. तुकारामांनी स्वतः राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी अशी परंपरा सांगितली आहे.
“राघव चैतन्य केशव चैतन्य l
सांगितली खुण मालिकेची ll
बाबाजी आपुले सांगितले नाम l
मंत्र दिला राम कृष्ण हरि ll”
तुकारामांनी अशा प्रकारे गुरुपरंपरा स्वतः सांगितली आहे.
तुकारामांनी सांगितलेल्या परंपरेविषयी विद्वानांमध्ये अनेक मतभेद आहेत. ते सुद्धा जाणून घेतले पाहिजे.
१) निरंजन रघुनाथ यांनी शके १७०९ मध्ये चैतन्य विजय कल्पतरू हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी कृष्णदास बैरागी यांनी शके १५९६ साली लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे लिहिला. त्या ग्रंथात राघव चैतन्य केशव चैतन्य यांची माहिती दिलेली आहे. केशव चैतन्य म्हणजेच बाबाजी असा ग्रंथकाराचा आग्रह आहे. हा ग्रंथ विश्वसनीय न वाटण्याचे कारण म्हणजे त्यात इतिहास कमी व दंतकथाच भरपूर आहेत.
२) बहिण बाई व निळोबा या तुकारामांच्या शिष्यांनी दिलेल्या परंपरेत काही फरक असले तरी राघव, केशव व बाबाजी हे तीन निरनिराळे महापुरुष होते या बाबत त्यांचे एकमत दिसते.
३) माहिपत बोवा, बहिणाबाईंचे दोन कवी शिष्य आणि रंगनाथ स्वामी यांचेही तुकारामांनी सांगितलेल्या गुरु परंपरेशी एकमत आहे. तुकारामांच्या शिष्या बहिणाबाईना तुकोबांची “ज्ञानेश्वर – सच्चिदानंद बाबा – विश्वंभर – राघवचैतन्य – केशव चैतन्य – बाबाजी – तुकाराम” अशी गुरुपरंपरा मान्य आहे.
बाबाजी चैतन्य यांनी तुकारामांना स्वप्नात येऊन “गुरूपदेश केला व रामकृष्ण हरि हा मंत्र” सांगितला. तेव्हापासून “नामस्मरण” हेच तुकारामांच्या परमेश्वर प्राप्तीचे साधन बनले. “रामकृष्ण हरि” हा मंत्र मिळाल्यावर तुकारामांना दुसरी कोणतीच उपाधी उरली नाही. तुकारामातील अपूर्णत्व संपले. गुरुपदेशामुळे त्यांची वृत्ती परतत्वाला स्पर्श करण्याइतकी समर्थ झाली.
संत तुकारामांची वृत्ती अंतर्बाह्य बदलली. श्री विठ्ठलाच्या चरणी त्यांचा एकविध भाव निर्माण झाला. हरिदर्शनाची त्यांना तळमळ लागली. त्यांचा जीव विठ्ठल भेटीसाठी कासावीस होऊ लागला. तुकारामांनी पांडुरंग भेटीसाठी जो आक्रोश केला, त्याची कल्पना कोणालाही करता येणे शक्य नाही. त्यानंतर जास्तीतजास्त काळ त्यांचा साधनेत जाऊ लागला. ध्यानी मनी स्वप्नी पांडुरंग दिसू लागला. एकमेव पांडुरंगाचे चिंतन ते करू लागले. विठ्ठल भेटीच्या ओढीतून त्यांना प्रतिभा युक्त कवित्वाची स्फूर्ती झाली. ज्या गुरुपदेशाची ते वाट पाहत होते तो त्यांना प्राप्त झाल्याने तुकाराम महाराज परतत्वाला स्पर्श करू शकत होते. कारण गुरूपदेश प्राप्त झाल्याने त्यांना आत्मबोध झाला. आत्मबोध झाल्याने त्यांना ज्ञान प्राप्त झाले. त्यासाठी त्यांना कोणत्याही शिक्षणाची व पदवीची आवश्यकता किंवा पात्रता लागत नव्हती.
तुकारामांना गुरुपदेशामुळे आत्मानुभूति प्राप्त झाली. ते परमार्थातले अधिकारी पुरुष झाले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कवित्व एकाएकी उजळून निघाले. गुरूचा लाभ झाला याचाच अत्यानंद तुकारामांना झाला.
“सर्वपक्षी हरी सखा झाला l
ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ll”
सर्व बाजूने हरी हा ज्याचा सखा झाला आहे. त्याच्या अंगणातील वेळी कल्पतरू, हवं ते देणाऱ्या होतात. ते सहज जरी रस्त्याने चालला. तर रस्त्यातील दगड गोटे त्याच्या स्पर्शाने चिंतामणी म्हणजे मनात जे येईल ते देणाऱ्या होतात.
संत तुकारामांची वाणी सहज जरी बोलली तरी त्यांचे घरी वेदांत पाणी भरतो त्यांच्या मुखातून वेदांताची गूढ प्रमेये बाहेर पडतात. असा प्रचंड आत्मविश्वास गुरुपदेशामुळे तुकारामांना आलेला आहे. सद्गुरूंनी तुकारामांवर कृपा केली. त्यामुळे तुकाराम धान्य झाले.
तुकारामांच्या जीवनसाधनेत्च्र सद्गुरूला अतिशय महत्वाचे स्थान आहे. श्रीगुरूच्या कृपेशिवाय साधनेची पूर्तता होऊ शकत नाही. कारण गुरू शिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय आत्मनुभूती नाही आणि जन्म मरणाच्या फेरीतून मुक्तता नाही. म्हणून गुरूची महती श्रेष्ठ आहे. शिवाय तितक्याच तोलामोलाचा गुरू लाभणे ही काही साधी घटना नाही. गुरू आणि शिष्य दोघेही योग्यतेचेच असावे लागतात. तुकाराम योग्य शिष्य होते. गुरूप्राप्तीमुळे तुकाराम आनंदमय तर झालेच पण निःसंग, निरहंकार, निर्व्याज अशा तुकारामांचे व्यक्तित्व अधिकच तेजाळून निघाले.
लेखक –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याच्या अभ्यासक, अमरावती.
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड
लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.






