गांधीजी मनुष्य नव्हेच तर एक विचार….

SHARE:

“माझे जीवन हाच माझा संदेश आहे!”

 

कल्पना करा…
एका हातात काठी… अंगावर साधे धोतर… पायात चप्पल नाही… पण त्या साध्याशा व्यक्तीच्या एका हाकेला लाखो भारतीय घराबाहेर पडले!
ज्याच्या हातात तलवार नव्हती, बंदूक नव्हती, सैन्य नव्हते…
पण ज्याच्याकडे होते — सत्याचे बळ, अहिंसेचे अस्त्र आणि जनतेचा विश्वास!
ते महामानव म्हणजे…
मोहनदास करमचंद गांधी!

आपले राष्ट्रपिता — महात्मा गांधी!

महात्मा गांधी म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे.
गांधी म्हणजे सत्याचा आग्रह!
गांधी म्हणजे अहिंसेची ताकद!
गांधी म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य!
आणि गांधी म्हणजे सामान्य माणसाच्या सामर्थ्यावर असलेला विश्वास!

गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. पुढे शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि वकिलीचे शिक्षण घेतले. परंतु त्यांच्या जीवनाला खरी दिशा मिळाली ती दक्षिण आफ्रिकेत. तेथे भारतीयांवर होणारा वर्णभेद आणि अन्याय त्यांनी अनुभवला. एका रेल्वे प्रवासात केवळ त्यांच्या वर्णामुळे त्यांना प्रथम श्रेणीच्या डब्यातून बाहेर फेकण्यात आले. तो प्रसंग त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा वळण ठरला. त्या अपमानातून एक प्रश्न जन्माला आला—
“अन्याय सहन करायचा की त्याविरुद्ध उभे राहायचे?”
गांधीजींनी उत्तर दिले—
“अन्यायाविरुद्ध लढायचे… पण द्वेषाने नाही; सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने!”

भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले.
चंपारण सत्याग्रह…
खेडा सत्याग्रह…
असहकार आंदोलन…
दांडी मार्च…
भारत छोडो आंदोलन…
या प्रत्येक आंदोलनामागे एकच शक्ती होती — जनतेची शक्ती!

१९३० मध्ये गांधीजींनी मिठाच्या कायद्याविरोधात दांडी मार्च केला. समुद्रकिनाऱ्यावर जाऊन त्यांनी हातात मीठ घेतले आणि ब्रिटिश सत्तेला एक स्पष्ट संदेश दिला — “साम्राज्य कितीही मोठे असले, तरी सत्याग्रह करणाऱ्या जनतेपेक्षा मोठे नाही!”

गांधीजींची अहिंसा ही भित्रेपणाची निशाणी नव्हती.
उलट…
अहिंसा म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे; अन्यायाला निर्भयपणे विरोध करणे!
त्यांनी सांगितल — “डोळ्यासाठी डोळा घेत राहिलो, तर अख्खे जग आंधळे होईल.”
आज आपण विज्ञानाच्या युगात जगत आहोत. मोबाईल आहे… इंटरनेट आहे… कृत्रिम बुद्धिमत्ता आहे… जग काही क्षणांत जोडले गेले आहे.
पण प्रश्न असा आहे —
माणूस माणसाच्या किती जवळ आला आहे?
आज सोशल मीडियावर मतभेद झाले की आपण संवादाऐवजी अपशब्द वापरतो. मतभिन्नता झाली की समोरच्याचा द्वेष करतो. खोटी माहिती क्षणात पसरते. अशा वेळी गांधीजींचा सत्याचा विचार आपल्याला काय सांगतो?
तो सांगतो —
“पहिले सत्य तपासा, मग बोला!”

आज समाजात जात, धर्म, भाषा, प्रदेश या कारणांवरून भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न होतो.
अशा वेळी गांधीजींचा संदेश आठवतो —
“माणुसकी ही कोणत्याही ओळखीपेक्षा मोठी आहे.”

गांधीजींनी स्वदेशीचा विचार मांडला. आज त्याचा अर्थ केवळ परदेशी वस्तू टाळणे एवढाच नाही.
आज त्याचा अर्थ असा घेता येईल —
स्थानिक उत्पादकांना संधी द्या, आपल्या गावातील कष्टकरी माणसाला साथ द्या, आपल्या श्रमाचा आणि आपल्या संसाधनांचा सन्मान करा.

गांधीजी स्वच्छतेलाही अत्यंत महत्त्व देत. आज आपण स्वच्छ भारताची चर्चा करतो.
पण स्वच्छता केवळ रस्त्यांची नसते…
स्वच्छ रस्ते हवेच; पण त्यासोबत स्वच्छ विचारही हवेत!

गांधीजींच्या जीवनात अनेक मतभेद, टीका आणि राजकीय संघर्ष होते. त्यांच्या प्रत्येक विचाराशी प्रत्येक व्यक्ती सहमत असेलच असे नाही.
पण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही —
त्यांनी आपल्या विचारांना स्वतःच्या जीवनात जगण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच गांधीजी केवळ इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त राहत नाहीत. ते आजही आपल्या प्रश्नांसमोर उभे राहतात…
जेव्हा आपण खोटे बोलण्याचा सोपा मार्ग निवडणार असतो —
गांधी आपल्याला सत्याची आठवण करून देतात.
जेव्हा आपण रागाच्या भरात हिंसेचा विचार करतो —
गांधी आपल्याला अहिंसेची आठवण करून देतात.
जेव्हा आपण एखाद्या गरीब माणसाकडे दुर्लक्ष करतो —
गांधी आपल्याला शेवटच्या माणसाचा विचार करण्यास सांगतात.
आणि जेव्हा आपण म्हणतो —
“मी एकटा काय करू शकतो?”

तेव्हा गांधीजींचे जीवन उत्तर देते —
“एका माणसाची सत्यावरची निष्ठा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते!”
म्हणून आज गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण फक्त त्यांच्या फोटोला हार घालू नये.
तर एक संकल्प करूया —
खोट्यापेक्षा सत्याची निवड करूया!
द्वेषापेक्षा संवादाची निवड करूया!
हिंसेपेक्षा अहिंसेची निवड करूया!
स्वार्थापेक्षा समाजहिताचा विचार करूया!
आणि अधिकारांसोबत कर्तव्याचीही जाणीव ठेवूया!
कारण…
गांधीजींना श्रद्धांजली त्यांच्या प्रतिमेला हार घालून नाही, तर त्यांच्या विचारांपैकी एखादा विचार आपल्या जीवनात उतरवूनच देता येईल!

शेवटी एवढेच लिहावं वाटते,
काठी होती हातात, पण सामर्थ्य होते विचारांचे;
वस्त्र होते साधे, पण स्वप्न होते स्वतंत्र भारताचे;
शस्त्र नव्हते हातात, पण साम्राज्याला हादरवण्याचे बळ होते सत्याग्रहाचे!

अशा या सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या पुजाऱ्याला…

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना कोटी कोटी प्रणाम!

 

लेखक –
चि. तन्मय ग. पुनसे
मु. पळसखेड, ता. चांदुर रेल्वे,
जि. अमरावती.
संपर्क – ७४९८९०८२३६

तन्मय गणेश पुनसे
Author: तन्मय गणेश पुनसे

लेखक एक उत्कृष्ट व्याख्याते, लेखक, विद्रोहीकवी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थी असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड या गावी ते राहतात. अंधश्रद्धा, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, भयकथा, शेतकऱ्यांच्या व्यथा इत्यादी विषयांवर लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे. जेष्ट साहित्यिक प्रा. हरी नरके कथा पुरस्कार 2024 व अमरावती जिल्ह्याचा कविवर्य नारायण सुर्वे काव्यलेखन पुरस्कार 2026 ने ते सन्मानित आहे. मागील गेल्या वर्षभरापासून विविध समाज माध्यमांद्वारे आपले लिखाण करून आपले विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा