दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे ‘अभिजात भाषेचा’ दर्जा बहाल केला. या केंद्राच्या ऐतिहासिक निर्णयाचे महत्त्व आणि आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३ ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला.
या दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी असलेल्या दुसऱ्या ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिना निमित्त’ कवी व साहित्यिक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख व कविता येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
माय मराठी…
माझा मराठाचि बोलू कौतुके।
परी अमृतातेही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या या ओळी मराठी भाषेचे श्रेष्ठत्व अधोरेखित करतात. माझी मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड आहे आणि ती अमृताशी पैज जिंकू शकते, असे ते अभिमानाने सांगतात.
अशा या थोर मराठी भाषेच्या गौरवाचा ३ ऑक्टोबर हा दिवस आहे.
महाराष्ट्राच्या आणि प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ होय. दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा’ बहाल केला. या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून आणि
या ऐतिहासिक निर्णयाचे महत्त्व आणि आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३ ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला.
कविवर्य सुरेश भट यांनी मराठी भाषेचे गौरव करणारे आणि तिचे महत्त्व सांगणारे अत्यंत सुंदर व सुप्रसिद्ध गीत लिहिले आहे.
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी..!
‘जुना ऐतिहासिक वारसा’
अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी ही केवळ एक आधुनिक भाषा नसून, तिला किमान १५०० ते २००० वर्षांपेक्षा ‘जुना ऐतिहासिक वारसा’ आहे हे सिद्ध झाले आहे. हा दिवस आम्हा प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीसाठी अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे, क्षण आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि अनेक थोर संतांच्या वाङ्मयाने समृद्ध झालेल्या मराठी साहित्याचा हा खऱ्या अर्थाने जागतिक गौरव आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या प्राचीन ग्रंथांचे जतन, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि सखोल संशोधनाचे मार्ग मोकळे झाले आहेत. या दर्जामुळे शैक्षणिक क्षेत्रात, भाषांतर, प्रकाशन आणि डिजिटल मीडियामध्ये मराठी तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत.
मराठी संस्कृतीचा उत्सव
या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि शासकीय संस्थांमध्ये विविध व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी संस्कृतीचा उत्सव साजरा केला जातो. मराठी अभिजात भाषा गौरव दिन आपल्याला आपल्या मातृभाषेचे जतन करणे, ती दैनंदिन व्यवहारात अभिमानाने वापरणे आणि पुढील पिढीपर्यंत तिचा समृद्ध वारसा पोहोचवण्याचा संदेश देतो. हा संदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचवून मातृभाषेचे जतन करू या.
‘मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त’ सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥
आणि
मराठीचा समृद्ध वारसा जपण्याच्या मनस्वी सदिच्छा ॥
– कविता –
अभिजात मराठी भाषा
अभिजात मराठीचा ।
भाषा दिन साजरा ॥
संवादातून जपू या ।
मराठी भाषा वारसा ॥ १ ॥
अभिजात मराठी भाषा ।
माझ्या मराठीचा थाट ॥
चमकणारे चांदणे ।
सह्याद्रीचा जणू घाट ॥ २ ॥
थोर संतांची ही वाणी ।
पवित्र अमृत धारा ॥
शिवबांच्या स्वराज्यात ।
गरजे मराठी नारा ॥ ३ ॥
युगा युगांचे वैभव ।
हे शब्दांतून सजते ॥
माय मराठीची गोडी ।
अभिजात ही गाजते ॥ ४ ॥
साहित्याचे जग ।
हिने विणले सुंदर ॥
अभिजात मराठीचा ।
सर्व करू या जागर ॥ ५ ॥
गौरवाचा शिरपेच ।
जगात या अभिमान ॥
श्रेष्ठ मराठी ही भाषा ।
मायबोलीचा सन्मान ॥ ६ ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
डॉ. हरिवंशराय बच्चन आदर्श शिक्षक
पुरस्कार प्राप्त कवी व साहित्यिक, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






