मराठी भाषेच्या अभिजाततेचा जागर; बांधिलकीचे तिसरे ऑनलाइन कविसंमेलन उत्साहात

SHARE:

अमरावती : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या गौरवपूर्ण पार्श्वभूमीवर बांधिलकी प्रतिष्ठान तसेच बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट, अमरावती यांच्या वतीने आयोजित ‘३ रे बांधिलकी ऑनलाइन कविसंमेलन २०२६’ नुकतेच गुगल मीटच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

 

या ऑनलाइन कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. पुष्पराज गावंडे (युवा कादंबरीकार तथा सुप्रसिद्ध वऱ्हाडी साहित्यिक, अकोला) होते. देवा झिंझाड (सुप्रसिद्ध साहित्यिक तथा प्रकाशक, पेन प्रकाशन, पुणे) यांच्या हस्ते कविसंमेलनाचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. रेखा जगनाळे (सुप्रसिद्ध साहित्यिक, नागपूर) आणि प्रा. महादेव लुळे (सुप्रसिद्ध साहित्यिक तथा अध्यक्ष, बोलीभाषा साहित्य संस्था, अकोला) उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘पणती जपून ठेवा, अंधार फार झाला’ या भावनेतून मराठी मायबोलीच्या संवर्धनाचा आणि भाषाभिमानाचा संदेश देणाऱ्या ऑनलाइन पणती प्रज्वलनाने झाली. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, तिचे सांस्कृतिक वैभव आणि बोलीभाषांचे महत्त्व यावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हि‍तेश गोमासे यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक ॲड. नीता प्रफुल्ल कचवे, अध्यक्ष, बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांनी केले. त्यांनी मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची आणि भावविश्वाची ओळख असल्याचे सांगत मायबोलीच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी माणसाने योगदान देण्याचे आवाहन केले. स्वागतम् गीत रोशनी कडू यांनी सादर केले, तर आभार राहुल गवस यांनी मानले.

कविसंमेलनात डॉ. राणी चौधरी, योगिता निपाणे, रविन दांडगे, शालिनी कावरे, प्रफुल्ल ठाकरे, कुमुद कोरेडे, माधुरी बाजारे, सुनील लव्हाळे, भगवान कानडे पाटील, रसिका पनके, सुनीता तायडे, स्वाती सेलोकर, घनश्याम सावकर, रोशनी कडू, प्रणाली चव्हाटे, श्रद्धा कोल्हटकर, ॲड. स्मिता बूल, अश्वीनी गहाणकरी, प्रिया सफळे, सुप्रसिद्ध गझलकार विजय वासाडे ‘विवा’, सुचिता टेमघरे, गजानन डेहनकर, श्रीमती सुलोचना लडवे, शालिनी कावरे, दीपमाला अहिरे, शारदा बरडे आणि उज्वला राहणे आदी निमंत्रित कवींनी आपल्या विविधांगी कवितांचे सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली.

मराठी भाषेवरील प्रेम, बोलीभाषांचा गोडवा, सामाजिक जाणिवा, निसर्ग, नातेसंबंध आणि मानवी संवेदनांनी नटलेल्या कवितांनी ऑनलाइन कविसंमेलनाला साहित्यिक उंची प्राप्त करून दिली. मराठी भाषेचा गौरव, मायबोलीचे संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत साहित्याची गोडी पोहोचविण्याचा बांधिलकी प्रतिष्ठानचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

ॲड. नीता प्रफुल कचवे
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे

लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा