नागपूर : जिल्हा परिषद नागपूर आणि विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूर यांच्यात दि. ०९ऑक्टोबर रोजी विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक सहकार्य घेण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. अशा प्रकारचा करार करणारी जिल्हा परिषद नागपूर ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
या करारांतर्गत डीपीडीसी, खनिज निधी व जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या ५० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकासकामांच्या निविदांसाठी व्हीएनआयटीच्या तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यामध्ये सिव्हिल वर्क्स, विविध उपकरणे व साहित्य खरेदी उदाहरणार्थ डिजिटल पॅनल, शालेय सॉफ्टवेअर, डेस्क-बेंच, सायकली, सीसीटीव्ही तसेच पाणीपुरवठा व जलसंधारण विभागाच्या निवीदांचाही समावेश असेल.

निविदापूर्व टप्प्यात तांत्रिक तपशील निश्चित करणे व बांधकामांच्या संरचनात्मक बाबींमध्ये मार्गदर्शन, निविदा प्रक्रियेदरम्यान तज्ज्ञांचा सहभाग, तसेच निविदेनंतर साहित्याचे नमुना परीक्षण, दर्जा तपासणी, इन्स्टॉलेशननंतर पडताळणी आणि किमतींचे मूल्यमापन यासाठी व्हीएनआयटीचे सहकार्य घेण्यात येईल.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विकासकामांसाठी रास्त व वाजवी दर सुनिश्चित करणे, गुणवत्तेची हमी बळकट करणे आणि निविदा प्रक्रिया विहित कालमर्यादेत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे हा आहे. यामुळे शासनाच्या निधीचा प्रभावी व योग्य विनियोग होऊन प्रत्येक खर्चातून जास्तीत जास्त सार्वजनिक मूल्य साध्य करण्यास मदत होईल.
व्हीएनआयटीसारख्या नामांकित तांत्रिक संस्थेच्या तज्ज्ञतेचा उपयोग करून जिल्हा परिषद नागपूर विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त यांना प्राधान्य देणार आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






