नागपूर : माजी गुन्हेगारी प्रकरणांशी सर्व संबंध तोडून गेल्या दोन वर्षांपासून सामान्य नागरिकाप्रमाणे शांततेत जीवन जगत असलेल्या स्वप्नील भोयर यांनी माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ते आज नागपुरातील धंतोली येथील पत्रकार भवनात प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते.
नेमकी प्रकरण व पार्श्वभूमी काय?
स्वप्नील भोयर यांनी सांगितले की, ते पूर्वी मानेवाडा परिसरात राहत होते. गेल्या दोन वर्षांपासून ते वाठोडा परिसरात कुटुंबासोबत राहत असून मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. भूतकाळात नागपुरातील काही गांवांशी संबंधित वाद व चर्चांमध्ये त्यांचे नाव जोडले गेले होते व त्यांच्यावर ५ गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले होते, ज्याची त्यांना आता खंत आहे. मात्र, लग्नानंतर आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांची जाणीव झाल्यामुळे त्यांनी गुन्हेगारी जगतापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेत मानेवाडा सोडून वाठोडा येथे बस्तान मांडले आणि जुना मोबाईल क्रमांकही बंद केला.
तडीपार आरोपीसोबत जोडल्या जाणाऱ्या संशयावर स्पष्टीकरण
काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांचे ३० ते ४० अधिकारी एका तडीपार आरोपीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून आपली शोध घेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या संदर्भातील सर्व पुरावे जसे की कॉल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशनची माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पोलिसांसमोर सादर केले आहेत. या पुराव्यांची योग्य पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
पोलिस प्रशासनाला निष्पक्ष चौकशीचे आवाहन
मा-हावर एका तडीपार आरोपीसोबत चारचाकी वाहनातूनतात शस्त्र घेऊन जुन्या विरोधी गटातील व्यक्तीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. हा आरोप चुकीचा असून यासंबंधीचे सर्व पुरावे पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस उपायुक्त आणि पोलिस आयुक्तांनी निष्पक्ष चौकशी करावी, तसेच सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी न करता कारवाई न करता योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
आपल्या जीवाला व कुटुंबाला धोका असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी प्रशासनाकडे योग्य संरक्षण व कायदेशीर मदतीची मागणी केली आहे. “मला न्याय द्या, मला नव्याने जगण्याची संधी द्या,” अशी भावनिक हाक देत स्वप्नील भोयर यांनी पोलिसांना या प्रकरणात न्याय देण्याची विनंती केली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






