ठाणे : काँग्रेस, इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडी लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली आडून देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विरोधात ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्याचे काम करत आहेत. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि घटनात्मक संस्थांवर संशय निर्माण करणे तसेच न्यायव्यवस्थेवर दबाव आणून न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा थेट अपमान आहे, असा घणाघाती प्रहार ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘लोकतंत्र बचाव पदयात्रेत’ करण्यात आला.

ठाण्यातील पाचपाखाडी ते ऐतिहासिक तलावपाळी दरम्यान ही भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘ईव्हीएम’वर संशय घेणाऱ्यांना आव्हान
विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांचा जोरदार समाचार घेण्यात आला. “व्होट चोरीचे आरोप करणाऱ्यांनी याबाबत ठोस पुरावे द्यावेत. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस व विरोधी पक्षांची सरकारे निवडून आली, ती काय व्होट चोरीने आली का? ईव्हीएमवर निवडून आलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी राजीनामा देऊन व्होट चोरी सिद्ध करून दाखवावी,” असे खुले आव्हान यावेळी देण्यात आले.


‘खरी व्होट चोरी २०१९ मध्ये झाली!’
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला स्पष्ट जनादेश बदलून काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणाऱ्या ‘उबाठा’ गटावर यावेळी जोरदार निशाणा साधण्यात आला. “२०१९ मध्ये जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला जनादेश दिला होता, तो काँग्रेससोबत जाऊन बदलण्यात आला. खरी ‘व्होट चोरी’ तेव्हा झाली,” असा टोला लगावण्यात आला. तसेच कोविड काळात मुंबई महानगरपालिकेत खुलेआम ‘नोट चोरी’ करणारे आज ‘व्होट चोरी’ची भाषा करत आहेत, अशी खरमरीत टीकाही केली गेली.

आणीबाणीची आठवण आणि लोकशाहीचे सत्य
१९७५ च्या आणीबाणीचा उल्लेख करत विरोधी पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. “१९७५ मध्ये देशात आणीबाणी होती, तेव्हा विरोधी नेते तुरुंगात होते आणि माध्यमांवर पूर्ण बंदी होती. आज विरोधक जंतरमंतरवर आंदोलन करतात, मोर्चे काढतात आणि थेट प्रधानमंत्र्याच्या घरासमोर निदर्शने करतात; तरीही देशात लोकशाही धोक्यात असल्याचा दावा करतात,” असा सवाल यावेळी करण्यात आला.

मोदीजींचे नेतृत्व आणि कल्याणकारी योजना
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या अभूतपूर्व विकासाचा पाढा यावेळी वाचण्यात आला. ८० कोटी जनतेला मोफत धान्य, जनधन योजना, लखपती दीदी, पीएम-किसान, बेटी बचाओ, स्टार्टअप इंडिया आणि स्किल डेव्हलपमेंट यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. जगातील ३६ देशांनी प्रधानमंत्र्यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे. आईच्या निधनानंतरही तातडीने देशाच्या कर्तव्यावर परतणारा हा कर्मयोगी प्रधानमंत्री आहे, त्यामुळे त्यांना पदावरून हटवणे अशक्य असल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केले.

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या भव्य पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत सावरा, माजी खासदार कपिल पाटील, संजीव नाईक, आनंद परांजपे, तसेच आमदार योगेश सागर, मंदा म्हात्रे, स्नेहा दुबे-पंडित, रवींद्र फाटक, राजन नाईक, निरंजन डावखरे, विक्रांत पाटील, कुमार अयलानी, शिवाजी पाटील, नरेंद्र मेहता, प्रशांत ठाकूर, सुलभा गायकवाड, राजेश मोरे, शांताराम मोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.





