
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अंशांच्याही खाली घसरला आहे. राज्यातल्या काही ठिकाणी थंडीची लाटही आली आहे.
पुढच्या काही दिवसांत मध्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज असून महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं काय अंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात सध्या कोरडं आकाश असून, उत्तर आणि पश्चिमेकडून कोरडे थंड वारे वाहात आहेत. हिमालयावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर आणि मध्य भारतात विशेषतः रात्रीचं किमान तापमान आणखी खाली घसरत आहे. त्यामुळे रात्रीचं किमान तापमान खाली घसरलं आहे.
महाराष्ट्रातही किनारी भाग आणि दक्षिणेकडचे जिल्हे वगळता इतर ठिकाणी किमान सरासरीएवढं किंवा त्यापेक्षा खाली राहिलं. ही स्थिती पुढचे दोन तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून दक्षिण भारतात तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. महाराष्ट्रातही २२ नोव्हेंबरच्या आसपास पावसाची शक्यता आहे.
पूर्व राजस्थान आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही भागांत १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, मराठवाडा, तेलंगणा आणि मध्य महाराष्ट्रात, तर मंगळवारी (१८ नोव्हेंबर) विदर्भात थंडीची लाट राहू शकते, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
थंडीच्या लाटेची शक्यता पाहता धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, जालना, बीड, वाशिम, परभणी, हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आदि ठिकाणी मंगळवारी (१८ नोव्हेंबर) यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर बुधवारी (१९ नोव्हेंबर) जळगाव आणि नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणच्या तापमानात घट दिसून येईल.





