
“मी अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी चार ते पाच दिवस संघर्ष करत होते. त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही. पहिल्यांदा कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता.
कागदपत्रं मिळाल्यानंतर मी माझ्या वकिलाकडून तीन-चार वेळा ती तपासून घेतली होती. प्रत्येक कागदावर माझ्या मुलाची सही होती. सूचक म्हणून तो माझ्यासोबत होता, मग त्याची सही कशी गायब झाली?
माझा अर्ज कसा बाद झाला किंवा केला गेला यासाठी मी आता न्यायालयात दाद मागणार आहे.”
अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांनी आता आपण न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं म्हटलं आहे.
१७ नोव्हेंबरला पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अवघ्या २४ तासात बाद ठरवला गेला.
अर्थात, हे राजकीय नाट्य केवळ या २४ तासातलं नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं अनगर हे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.
इथली नगरपंचायतीची निवडणूक, भाजप आमदार राजन पाटील यांचं राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांचे आरोप अशा अनेक घटनांमुळे अनगरची चर्चा सुरू आहे.





