
नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानलेल्या मामाकडून दोघा भाचींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. पीडित मुलींच्या आईकडून दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार, पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळचा यूपी येथे राहणारा व सध्या मालेगाव येथे वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीकडून मानलेल्या बहिणीच्या मुलींवर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या दोघी मुलींवर निरनिराळ्या ठिकाणी या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. संशयित आरोपी हा पीडित मुलींचा मानलेला मामा असल्याची माहिती आहे. त्याचे आणि पीडित मुली यांच्या आईची १० वर्षांपेक्षा अधिकची ओळख होती. दोघे एकमेकांना भाऊ बहीण मानत होते. या दरम्यान, सदर महिलेने मुलांकडे लक्ष राहावे म्हणून सदर मानलेल्या भावावर विश्वास ठेवत त्याला आपल्या मुलींकडे घरी एकट्या असल्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं होतं.
मात्र, सदर नराधमाने याचा गैरफायदा घेऊन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत दोघी मुलींवर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. सदर बाब ही पीडित मुलींच्या आईच्या मैत्रिणीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पीडित मुलींच्या आईला याबाबत त्याचं गैरवर्तन लक्षात आणून दिलं. त्यानंतर सदर बाब लक्षात येताच पीडित मुलींच्या आईने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून संशयित मानलेल्या मामाविरोधात तक्रार देण्यात आली, त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी फिर्याद नोंदवून, महिलेच्या मानलेल्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हा नराधम फरार असून, इंदिरानगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.





