
तुळजापूर – तुळजापुरमध्ये हवेत गोळीबार करण्यात आला आहे. भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे, व तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार केल्यानंतर काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी झाला आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या तुळजापुरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन गटातील राड्यात हवेत गोळीबार झाल्याचीही माहिती आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यात ही हाणामारीची घटना घडली आहे. तर या हाणामारीत तलवार आणि चाकूचा देखील वापर केल्याचे बघायला मिळाले आहे. गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दोन गटातील या राड्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावला आहे, तर जमावाला पांगवला आहे. याप्रकरणात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी झाला आहे. मानेवर चाकू, कोयत्याने वार केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातुन ही मारामारीची घटना घडली आहे. परिणामी त्याला आता हिंसक वळण लागले आहे. भाजप उमेदवार पिटू गंगणे आणि महाविकास आघाडीच्या ऋषी मगर यांच्यात वाद निर्माण झाला होता. अगोदर हा वाद मिटला होता. मात्र त्यानंतर पुन्हा या वादाला हिंसक वळण लागून यात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर हल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर हे गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. कुलदीप मगर यांच्या मानावर चाकूने, कोयत्याने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती, दरम्यान त्यांना रात्रीच उपचारासाठी सोलापूरला हलवले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. राड्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावला आहे.
दोन गटातील या राड्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवले आहे. मंगळवारच्या रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेचा पंचनामा आणि तपास करण्यात येत आहे. एकीकडे महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. अशातच या दोन गटातील राड्यानंतर तुळजापुरातील राजकीय वातावरण अजून तापल्याचे बघायला मिळते आहे. राज्यात निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकीय वादाच्या घडामोडी वाढल्या आहेत.





