अहिल्यानगरमध्ये ४० वर्षीय महिलेचा खुन, पोलिसांकडून ४ महिलांना अटक…

SHARE:

अहिल्यानगर – अहिल्यानगरमध्ये ४०  वर्षीय महिलेचा खुन करण्यात आला आहे. पोलिसांकडून ४  महिलांना अटक केली आहे. अहिल्यानगरमध्ये ४  युवतींनी मिळून ४०  वर्षीय महिलेचा खून केला आहे. पोलिसांनी २४ तासांत या प्रकरणात ४ महिलांना अटक केली आहे. अहिल्यानगर जवळील बोल्हेगाव येथे राहत असलेल्या मनिषा शिंदे यांचा त्यांच्याच राहत्या घरात धारदार शस्त्राने गळयावर वार करून खून केल्याची घटना समोर आली होती.

अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात दागिन्यांच्या लालसेतून ४०  वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने ४  महिलांना अटक केली. विशेष म्हणजे हा खून कोणी सराईत गुन्हेगारांनी नव्हे, तर चार युवतींच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्यानेही परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या घरात घुसून या चार जणींनी दागिने चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच झालेल्या झटापटीत ब्लेडने वार करत महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी, चारही युवतींना पोलिसांनी अटक केली आहे.

बोल्हेगाव येथे राहत असलेल्या मनिषा शिंदे यांचा शुक्रवारी त्यांच्याच राहत्या घरात धारदार शस्त्राने गळयावर वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करत चार युवतींना अटक केली आहे. त्यातून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत महिलेच्या शेजारी माहेर असलेल्या दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे या २०  वर्षीय युवतीनेच या खुनाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. कारण, तिला मयत महिलेच्या दागिन्यांची माहिती होती. त्याच माहितीच्या आधारे तिने आपल्या तीन साथीदार महिलांना सोबत घेऊन चोरीचा डाव आखला होता. मात्र, या चोरीच्या डावात चार जणींनी एकत्र येत ४०  वर्षीय महिलेचा खून केला आहे.

पोलीस तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, दिव्या देशमुख आणि तिच्या साथीदारांनी मयत महिलेच्या घरात प्रवेश करून गळ्यातील दागिने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या महिलेने आरडाओरड सुरु केल्याने जवळच असलेल्या ब्लेडने गळयावर वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी दिव्या खाडे, अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे. याप्रकरणात अधिक तपास अहिल्यानगर पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा