
चंद्रपूर – चंद्रपूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकाराने कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला लावली. जिल्हातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. रोशन सदाशिव कुडे असे या पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. एकीकडे राज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ढोल बडवला जात असतानाच ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रश्न भीषण असून त्यांची अवस्था किती दयनीय आहे, हे या घटनेवरून दिसून येते.
काही वर्षांपूर्वी रोशन कुडे या शेतकर्याने दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये व्याजाने खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची जनावरे मेली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावला. मात्र कर्जाचा बोजा वाढत गेल्यामुळे आणि व्याजाची रक्कम प्रचंड वाढली. यानंतर सावकाराने वारंवार रोशन कुडे या शेतकर्याकडे पैशांसाठी तगादा लावला. पण रोशन यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने ते सावकाराचे कर्ज फेडू शकले नाहीत.
सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी शेतकरी रोषण कुडे यांनी आपल्या आयुष्यातील सर्व काही पणाला लावले. शेतीची जमीन, ट्रॅक्टर तसेच घरातील मौल्यवान साहित्य विकूनही कर्जाचा डोंगर कमी झाला नाही. त्यामुळे अखेर त्या सावकाराने पैसे फेडण्यासाठी शेतकऱयाला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला. सावकाराच्या जाचाला कंटाळून आणि दुसरा कोणताही पर्याय नसल्याने, पीडित शेतकऱ्याने सावकाराच्या सल्ल्यानुसार आधी कोलकाता आणि नंतर तिथून कंबोडिया येथे जाऊन ८ लाख रुपयांना स्वतःची किडनी विकली. सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतक़रयाने सावकारावर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
एक लाख कर्ज घेतलं होतं. त्याचे ७४ लाख झाले. शेतकऱयाचं अजूनही कर्ज पूर्णपणे फिटलेलं नाही. पैशासाठी तगादा सुरूच आहे. कर्जासाठी किडनी गेली. आता हाती काहीच उरलं नाही. आता मंत्रालयात पुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करू, असं शेतकरी कुडे यांनी म्हटलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत कुडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अखेर न्याय मिळत नसल्याने आणि सावकारी जाच थांबत नसल्याने त्यांनी अखेर टोकाची भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सावकारांकडून होत असलेला जाच आणि न्यायाची मागणी केली आहे. तसेच राज्य शासनाला ही त्यांनी न्यायासाठी साकडे घातले आहे. न्यायासाठी शेवटचा मार्ग म्हणून रोशन कुडे यांनी कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
या घटनेमुळे राज्यातील सावकारीविरोधी कायद्यांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षितता आणि प्रशासनाची संवेदनशीलता यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही घटना केवळ एका शेतकऱ्याची नाही, तर महाराष्ट्रातील असंख्य बळीराजांच्या वेदनेचे भयावह चित्र दर्शवित आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
एकीकडे देशात आणि राज्यात राज्यकर्त्यांकडून विकसित भारत आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्नं दाखवली जात असतानाच स्वातंत्र्यापासूनच उपेक्षित राहिलेल्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आजही गरिबीमुळे होणारी शेतक़रयांची होरपळ किती विदारक आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आले आहे.





