
हवामान : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडील शीत वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तर या थंडीचा परिणाम उत्तर व मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही जाणवू लागला आहे. अशातच विदर्भासह नागपुरात आजही थंडीची लाट पसरल्याचे चित्र आहे. नागपुरात आज सकाळच्या सुमारास ८.० अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद (Weather Update) करण्यात आली आहे. तर गोंदिया जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिवसाही थंडीचा सामना करावा लागतो आहे.
पुढील तीन दिवस थंडी कायम राहणार, हवामान विभागाकडून अंदाज
राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली आहे. गोंदियाचे आजचे तापमान ७.६ अंश सेल्सियस इतके आहे. सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचे तापमान राज्यात सर्वात कमी असल्याची माहिती आहे. यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून बहुतांश जिल्ह्यातील तापमान १० अंशाच्या खाली गेल्याचे चित्र आहे. यवतमाळमध्ये ९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर भारतात थंडीची लाटेचा परिणाम आता विदर्भावर देखील झाल्याचे दिसून आलं आहे. तर पुढील तीन दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
गोंदिया : सलग दुसऱ्या दिवशी गोंदियाचे राज्यात सर्वात कमी तापमान
गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर काही कमी होताना दिसत नसून उलट थंडी आपला कहर आणखी वाढविताना दिसत आहे. काल मंगळवारी गोंदिया जिल्ह्याचा पारा आणखी घसरला असून, थेट ७ अंशावर गेला. विशेष म्हणजे, हे यंदाचे सर्वांत कमी तापमान असून, हवामान खात्याने आज बुधवारी गोंदिया जिल्ह्यात ‘शीतलहर’चा इशारा दिला आहे. रविवारी गोंदिया जिल्ह्याचे किमान तापमान १२.२ अंशावर पोहोचले होते व त्यामुळे आता थंडीचा जोर कमी होणार असे वाटत होते. यामुळे थंडीपासून त्रासलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, लगेच पाऱ्याची घसरण सुरू झाली. अशात मंगळवारी थंडीने कमालच केली असून, पारा थेट ७ अंशावर गेला. हा या वर्षीच्या सर्वात कमी तापमान नोंद घेण्यात आली आहे.





