पत्नीला धमकी, ‘सचिन माजलाय, हातपाय मोडावे लागतील’, अपहरण करून…

SHARE:

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील शिर्डीतील तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करत मृतदेह टायर आणि डिझेलच्या साहाय्याने जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार दिपक पोकळे, प्रवीण वाघमारे आणि त्यांच्या साथीदारांच्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. १० डिसेंबर २०२५ रोजी शिर्डीतील सचिन गिधे या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर फरार झालेले आरोपी सातत्याने ठिकाणं बदलत पोलिसांना चकवा देत होते. अखेर पोलिसांनी सापळा रचत मोठ्या शिताफीने संगमनेर तालुक्यातील मेंढवण परिसरातून आरोपींना जेरबंद केलंय. अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून गिधे याची हत्या करून मृतदेह जाळून टाकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणातील कुख्यात आरोपी दिपक पोकळे याच्यावर याआधी मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडे आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या हत्येचा पुढील तपास राहाता पोलीस करत असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

आरोपींचा पहिला गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी सचिन कल्याणराव गिधे (रा. हॉलीडे पार्क शेजारी शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हा साई सुनिता हॉटेल शिर्डी या ठिकाणी गेला होता. त्यादरम्यान फिर्यादी श्रध्दा गिधे यांना आरोपी प्रविण वाघमारे याने फोन करुन ‘सचिन लई माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील’, अशी धमकी दिली. सचिन गिधे हा परत घरी न आल्याने फिर्यादी श्रध्दा सचिन गिधे यांनी दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन राहाता पोलीस ठाणे गु.र.नं. ४५४/२०२५  भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) प्रमाणे आरोपी प्रविण उर्फ पचास वाघमारे, दिपक अंबादास पोकळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींचा दुसरा गुन्हा
दि.१० डिसेंबर २०२५ रोजी गौतम कैलास निकाळे (वय 25, रा. राहाता, ता. राहाता, हल्ली रा. सौंदडीबाब चौक) याला आरोपी प्रविण वाघमारे व त्याचा साथीदारांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याला साकुरी शिव याठिकाणी जाऊन येवू असं म्हणून मोटारसायकलवर बसवलं. त्यानंतर उपासणे बाबा मंदीराच्या पाठीमागे या ठिकाणी नेत त्याला आरोपी प्रविण वाघमारे व त्याच्या इतर साथीदारांनी लाथा बुक्क्या व दगडाने मारहाण करुन पाय फ्रॅक्चर केला. सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०२७/२०२५  भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) ,३(५) प्रमाणे दिनांक १२ डिसेंबर २०२५  रोजी गुन्हा दाखल आहे.

आरोपी प्रविण वाघमारे याने व त्याच्या साथीदारांनी एकाच दिवशी दोन गुन्हे केलेले असून अपहरित इसमाचा शोध लागलेला नसल्यानं एसपी सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपींचा तसेच अपहरित इसमाचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते. सदर आदेशानुसार सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, दिपक घाटकर, राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सुनिल मालणकर, सतिष भवर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड, भगवान धुळे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अपहरित इसमाचा शोध घेणेबाबत आरोपीची माहिती काढणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन रवाना करण्यात आले होते अखेर या पथकाने संगमनेर तालुक्यातून आरोपींना जेरबंद केले.

Leave a Comment

अधिक वाचा