जळगाव – जळगावमध्ये किरकोळ वादातून, एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील जुना मारुती मंदिर परिसरात, किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सागर अरुण बिऱहाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात, सागर बिऱहाडे याचा एका व्यक्तीसोबत, किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक असलेला हा वाद काही वेळातच, हाणामारीत रूपांतरित झाला. यावेळी आरोपीने त्या तरूणाला जोरात ढकलल्याने तो, खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत सागरला तात्काळ जळगाव, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केले. हा मृत्यू झाल्याचे समजताच, रुग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
सागरचा मृत्यू झाल्याचे घोषित होताच, जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला असून, रात्री उशिरापर्यंत परिस्थिती तणावपूर्ण होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रुग्णालय परिसरात बंदोबस्त वाढवला होता. या घटनेची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पथकाने मृताच्या नातेवाईकांकडून सविस्तर माहिती घेतली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणात, जळगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.





