सोनोग्राफीसाठी आलेल्या आजीला दरवाजासमोर झोपावलं, सेंटर बंद करून कर्मचारी पसार, बीडमधील माणूसकीला काळीमा फासणारी घटना

SHARE:

बीड – जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आलेल्या एका वयोवृद्ध महिलेला दाराच्या बाहेर झोपवलं आणि दार बंद करून कर्मचारी पसार झाले. माणुसकीला काळमि फासणारी ही घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी देखील होते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध आजी तिसऱ्या मजल्यावर भरती होत्या. त्यांना डॉक्टरांनी सोनोग्राफी सांगितली होती. जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून काही लोकांनी उचलून खाली आणलं. सहा वाजेच्या अगोदर सोनोग्राफी सेंटर समोर त्या आजी आल्या. मात्र सोनोग्राफी सेंटरमधील परिचारिकेनं आजी समोर झोपलेली असताना सुद्धा तिच्यावर कसल्याही प्रकाराचे लक्ष न देता, पावणे सहा वाजताच सोनोग्राफी सेंटर बंद केलं. यानंतर नातेवाईकांनी विचारणा केली असता नर्सने उर्मट भाषा वापरली आणि त्या आजीला तसंच सोडून सेंटर बंद करून पसार झाली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अगोदरच वेळा पाळत नसल्यामुळे रुग्णांमध्ये संताप आहे. त्यातच सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माणुसकी हरवली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसंच संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होते आहे. दरम्यान, या प्रकरणात आपण चौकशी केली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या परिचारिकेसह डॉक्टरची चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सतीशकुमार सोळंके यांनी दिली.

Leave a Comment

अधिक वाचा