मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला

SHARE:

मुंबई – मुंबईतील पश्चिम रेल्वमार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी रात्री आलोक सिंह (वय ३१) या प्राध्यापकाचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली होती. मालाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आता आरोपी ओंकार शिंदे (वय २७) याला अटक केली आहे. ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याच्या कारणावरुन आलोक सिंह आणि ओंकार शिंदे यांच्यात वाद झाला होता. या वादात ओंकारचा संताप हाताबाहेर गेल्याने त्याने आलोक सिंह यांच्या पोटात चाकू खुपसला होता. त्यानंतर ओंकार शिंदे हा फरार झाला होता. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला होात. रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी ओंकार शिंदे याला वसई स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. सध्या आरोपीला बोरिवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. हा वाद इतका विकोपाला का गेला, याचे नेमके कारण कळू शकले नव्हते. फक्त धक्का लागल्याचा राग आल्याने ओंकार शिंदे याने इतके टोकाचे पाऊल उचलले का, हे आता तपासले जाईल. या चौकशीतून आता काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

मालाड रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?

आलोक सिंह हे विलेपार्ले येथील एन.एम. महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते अवघ्या ३१ वर्षांचे होते. शनिवारी रात्री ते विलेपार्ले स्थानकातून लोकल ट्रेन पकडून मालाड येथे पोहोचले. मालाड स्थानकात उतरत असताना दरवाज्यात उभ्या असलेल्या ओंकार शिंदे यांना त्यांचा धक्का लागला. यावरुन आलोक सिंह आणि ओंकार शिंदे यांच्यात भांडण झाले. हे भांडण इतके टोकाला पोहोचले की, ओंकार शिंदे याने त्याच्याकडील चाकू काढून तो आलोक सिंह यांच्या पोटात खुपसला. यामध्ये आलोक सिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे पोलीस मारेकऱ्याचा कसून शोध घेत होते.

Leave a Comment

अधिक वाचा