मुंबई – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातानंतर व्हीएसआर या विमानांचं विशेष ऑडिट करण्यात आलं. त्यामध्ये उणीवा आढळल्यामुळं नागरी विमान वाहतूक महासंचालनाने (डीजीसीए) चार लिअरजेट ४५ विमानांच्या उड्डाणांना बंदी घातली. या प्रकरणी व्हीएसआर विमान कंपनी आणि डीजीसीए च्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी रोहित पवार आणि अमोल मिटकरी पोलिसांवर चांगलेच भडकले. याचा व्हीडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला आहे.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सुरुवातीला अधिकाऱ्यांकडून एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे रोहित पवार आणि अमोल मिटकरी दोघेही आक्रमक झाले. आमच्या घरातील माणूस गेला आहे, राज्याचा एक महत्त्वाचा नेता अपघातात मृत्युमुखी पडला आहे. अशा गंभीर घटनेत एफआयआर न घेणं ही मोठी बेपर्वाई आहे, असे सांगत रोहित पवार यांनी पोलिसांवर भडकले.या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित झोनचे डीसीपी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. प्रशासनाने प्रथम तक्रार नोंदवावी असे सांगितले होते, मात्र रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे एफआयआरवरच आग्रही असल्याचे दिसून आले.
अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर डीजीसीएनेकेलेल्या चौकशीत संबंधित विमान कंपनीच्या अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. या सर्व तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षेच्या नियमांचे झालेले उल्लंघन विविध प्रसारमाध्यमांतूनही सविस्तरपणे मांडले गेले आहे. एवढे स्पष्ट पुरावे उपलब्ध असताना आणि संपूर्ण राज्याच्या लाडक्या नेत्याचा जीव गेलेला असताना, पोलीस प्रशासन एफआयआर नोंदवण्यासाठी किंवा संबंधितांना ताब्यात घेण्यासाठी टाळाटाळ का करत आहे? असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतला.
यावेळी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दोन्ही आमदारांची तीव्र बाचाबाची झाली. याचे काही व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर प्रसारित झाले असून, त्यात रोहित पवार आणि अमोल मिटकरी अत्यंत संतापलेले दिसून येत आहेत. सामान्य जनतेला न्याय हवा आहे, केवळ आश्वासने नकोत अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत ठोस कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार या दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
रोहित पवार यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले, यावेळी त्यांचा पोलिसांनी शाब्दिक वाद झाला. पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढेही पोलिस ठाण्यात दाखल झाले. योग्य ती कारवाई करू, कायद्याच्या चौकटीतून ती कारवाई होईल असं त्यांनी यावेळी आमदारांना आणि नेत्यांना सांगितलं मात्र, तक्रारअर्ज करून भागणार नाही गुन्हा दाखल करावा, यावरून आमदार आक्रमक झाल्याचे दिसून आले.
रोहित पवार यांनी पोलिस ठाण्यात आक्रमक पवित्रा घेत पोलिसांना धारेवर धरत विचारले की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत, तरीही पोलीस अद्याप एफआयआर का दाखल करत नाहीत? विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावखाली काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या राज्यात अजितदादांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना कसा न्याय मिळेल, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
तर आमदार अमोल मिटकरी यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढ्या मोठ्या नेत्याचा जीव जातो आणि पोलीस केवळ चौकशीचे नाव सांगून वेळकाढूपणा करत आहेत, असे मिटकरी म्हणाले. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे तातडीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी रोहित पवार आणि उपायुक्त मुंढे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यावरोधात तात्काळ तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली.





