हॅकिंगच्या माध्यमातून तरूणाने शिक्षिकेला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघड; सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

SHARE:

बुलढाणा – जिल्ह्यात हॅकिंगच्या माध्यमातून तरूणाने शिक्षिकेला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका तरूणाने शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून हा सायबर गुन्हेगारी प्रकार समोर आला आहे. एका २७ वर्षीय शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून, त्यातील खासगी डेटा चोरून त्या शिक्षिकेला त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सोनाळा पोलिसांकडून ऋषिकेश गिरी नावाच्या आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश गिरी याने पीडित शिक्षिकेचा मोबाईल बेकायदेशीरपणे हॅकं केला होता. हॅकिंगच्या माध्यमातून त्याने शिक्षिकेचे व्हॉटसॲप चॅटस, ईमेल आणि गॅलरीमधील अत्यंत खासगी फोटो व व्हिडिओ स्वतःच्या ताब्यात घेतले होते.

तुझे हे सर्व फोटो आणि व्हिडिओ मी तुझ्या पतीला व नातेवाईकांना पाठवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी त्याने पीडित शिक्षिकेला दिली होती. बदनामीच्या धाकाने पीडित शिक्षिका मानसिक तणावाखाली असताना, आरोपीने याचा गैरफायदा घेतला आहे. त्याने शिक्षिकेला वारंवार व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास भाग पाडले आहे. आरोपी ऋषिकेशने व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते पीडित शिक्षिकेच्या बहिणीलाही पाठवले आहे. जेव्हा पीडित शिक्षिकेने विरोध केला, तेव्हा जर तू माझ्याशी नाते ठेवले नाहीस, तर तुला आणि तुझ्या मुलाला ठार मारीन, अशी जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती.

सततचा मानसिक छळ आणि मुलाच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता, पीडित शिक्षिकेने बुलढाण्यातील सोनाळा पोलिस ठाण्यात तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाई केली आहे. कलम ६७/२०२६ नुसार ७५(१),७५(२),७७,७८,३५२,३५१(२),३५१(३),३५६(२) २०२३  सहकलम ६६(ई ), ६७ ,६७ (ए) माहिती तत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील आरोपी ऋषिकेश गिरी फरार झाला आहे. बुलढाणा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. सायबर सुरक्षेबाबत बुलढाणा जिल्ह्यातील महिलांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणात अधिक तपास बुलढाणा पोलिस करत आहेत

Leave a Comment

अधिक वाचा