संभाजी नगर – मेडिकल सीईटीची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे. संभाजीनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मनस्वी गाडगे ही अभ्यासात हुशार मुलगी होती. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली होती आणि ती मेडिकल सीईटीची तयारी करत होती. बारावीची परीक्षा पूर्ण करून मेडिकल सीईटीची तयारी करत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १७ वर्षीय मनस्वी गाडगे हिचा अपघाती मृत्यू झाला आहे.
हिरापूर शिवारात मंगळवारी घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली होती. उपचार चालु असताना घाटी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी संभाजीनगरमधील चिकलठाणा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले आहे, व या अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनस्वी गाडगे ही १७ वर्षीय मुलगी हिरापूर येथे कुटुंबासह राहत होती.
तिचे वडील विजय गाडगे हे खासगी हॉटेलमध्ये व्यवस्थापक आहेत. ते आजारी असल्याने संभाजीनगरमधील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील रुग्णालयात उपचार घेत होते. मनस्वी गाडगे आई आणि धाकट्या बहिणीसह दुचाकीवरून बाहेर पडली होती. बहिणीला शाळेत सोडुन आणि वडिलांना रुग्णालयात डबा घेऊन जात होती. मात्र, वाटेत आईला अचानक चक्कर आल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली होती. त्यावेळी मुरूम टाकणारा हायवा ट्रकचालक मागे घेत असताना मनस्वी गाडगेच्या अंगावर ट्रक गेला.
या अपघातात तिची आई बाजूला फेकली गेली, तर मनस्वी गाडगेचा अपघात झाला. संभाजीनगरमध्ये शासकीय कामासाठी विनाक्रमांकाचा हायवा ट्रक वापरला जात असल्याचे उघडकीस झाले आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदत करत मनस्वी गाडगेला हिरापूरपासून १८ किलोमीटर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारांना उशीर होत असल्याने तिला घाटी रुग्णालयात नेण्यात आले. १८ किलोमीटरचा प्रवास जखमी अवस्थेत करावा लागल्याने उपचार सुरू होण्यास उशीर झाला, आणि उपचार चालु असताना मनस्वी गाडगे या तरूणीचा मृत्यू झाला.
तिच्या मृत्यूमुळे हिरापूर परिसरात शोककळा पसरली आहे. या तरूणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले आहे. या संभजीनगरमधील हिरापूर परिसरात योग्य रस्ता नाही आहे, परिसरात सुरू असलेल्या खासगी बांधकामांमुळे दिवसभर सिमेंट मिक्सर आणि विनाक्रमांकाचे हायवा ट्रक वेगाने धावत असतात. या भागात अरुंद रस्ता, मोठ्या प्रमाणातील धूळ आणि अवजड वाहनांची रहदारी यामुळे या परिसरातील स्थनिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
या अपघातानंतर संभाजीनगरमध्ये हीच परिस्थिती कायम आहे. या प्रकरणात संतप्त नातेवाईकांच्या मागणीनंतर चिकलठाणा पोलिसांनी हायवा ट्रकचालक, महापारेषण तसेच कंत्राटदार यांच्याविरोधात मनस्वी गाडगेच्या मृत्यूस जबाबदार ठरवून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगरमधील हिरापूर परिसरात सतत सुरू असलेल्या हायवा ट्रक आणि सिमेंट मिक्सरच्या वाहतुकीमुळे लहान वाहनचालकांना साईड न दिल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केलेल्या आहेत. याप्रकरणात अधिक तपास चिकलठाणा पोलिस करत आहेत.





