अमली पदार्थ तस्करीविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई; ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

SHARE:

पुणे – जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करीविरोधात ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे, तर या प्रकरणात ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कडक कारवाई केली आहे. यात रांजणगाव एमआयडीसी परिसरात एमडी मेफेड्रोन ड्रग्जचा भांडाफोड केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी संयुक्तपणे टाकलेल्या धाडीत ३४ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सोमवारी दि.१६ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे पथक रांजणगाव परिसरात गस्त घालत होते.

यावेळी गणेगाव रोडवरील संकल्प सिटी परिसरात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली आहे. या कडक कारवाईत प्रशांत मावळे रांजणगाव, मूळ-शिरूर याला अटक करण्यात आले आहे.

रांजणगाव पोलिसांनी त्याच्याकडून ३४ ग्रॅम एमडी ड्रग्जसह इलेक्ट्रिक वजन काटा आणि स्टील प्लेट असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील आरोपीवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अमली पदार्थ त्याने कोठून आणला? आणि तो कोणाला विकणार होता? याचा अधिक तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा