अल्पवयीन मुलांच्या हत्या प्रकरणात, पोलिसांकडून सिरियल किलर आरोपीला अटक; २ मुलांचा जीव घेण्याचे ठिकाण व पद्धत एकसारखी

SHARE:

पुणे – जिल्ह्यातील २ अल्पवयीन मुलांच्या हत्या प्रकरणात, पोलिसांकडून सिरियल किलर असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. २ वर्ष, २ मुले पण ठिकाण आणि हत्येची पद्धत सारखीच होती. पुण्याला हादरवणाऱ्या २ अल्पवयीन मुलांच्या हत्येच्या प्रकरणात एका सिरियल किलरला अटक केली आहे. तर या प्रकरणात आरोपी सिरियल किलरकडून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. दोन मुलांच्या हत्या प्रकरणातील पहिली घटना २१ जून २०२४ रोजी घडली होती, तर दुसरी घटना १७ मार्च २०२६ रोजी घडली आहे.

दोन्ही मुलांचे वय ११ ते १२ वर्षे होते, आणि दोघांच्याही हत्येची पद्धत एक सारखीच होती. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी परिसरात गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेल्या अल्पवयीन मुलांच्या हत्या प्रकरणाचा आता खरा आरोपी पकडण्यात आला आहे. एका २२ वर्षीय तरुणाने केवळ समलैंगिक संबंधांना विरोध केला म्हणून २ अल्पवयीन मुलांची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली आहे. अक्षय दत्तात्रय मांजरे वय २२ असे या सिरियल किलर आरोपीचे नाव आहे.

त्याच्या या जबाबामुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात झालेल्या २ अल्पवयीन मुलांच्या हत्येनंतर या सिरियल किलरने केलेल्या घटना आता उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणातील दोन्ही अल्पवयीन मुलांचे मृतदेह हे एकाच शेतात सापडले होते. सुरुवातीला पोलिसांनी या दोन्ही घटनांकडे गांभीर्याने न पाहता, हा बिबट्याचा हल्ला असल्याची शक्यता आहे, असे समजुन तपास वनविभागाकडे सोपवला होता.

मात्र, वनविभागाने वन्यप्राण्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही पोलिसांनी तपासात टाळाटाळ केली होती. पहिल्या खुनाच्या वेळी अक्षय मांजरेवर संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी त्याला चौकशी करून सोडून दिले होते. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे हा आरोपी असलेला सिरियल किलर १८ महिने फिरत राहिला. आणि त्याने दुसऱ्या अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर दहिवडी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे गावातील स्थानिक ग्रामस्थ म्हणाले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या प्रचंड दबावानंतर पोलिसांनी तपास केला आहे. आणि २४ तासांत अक्षय मांजरेला अटक करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, आरोपी अक्षय पहिल्या मुलाच्या अंत्यविधीतही सहभागी झाला होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. न्यायालयाकडून या आरोपीला ५ दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अधिक तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा