जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याकडून पवनार येथील रेशीम प्रकल्पाची पाहणी; शेतीला पुरक व्यवसायाची जोड देण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न

SHARE:

वर्धा – जिल्ह्यातील शेतीला पुरक व्यवसायाची जोड देण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आज पवनार येथील प्रगतशील रेशीम शेतकरी महेंद्र राऊत यांच्या तुती बाग व रेशीम किटक संगोपन प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत रेशीम प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम किटकांचे संगोपन, तुती लागवड आणि रेशीम कोष निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष शेडमध्ये जाऊन पाहिली. यावेळी शेतकरी महेंद्र राऊत यांनी २ एकर क्षेत्रावर तुती लागवड केलेली असून मनरेगा योजनेचा लाभ मिळालेला आहे, असे सांगितले. तसेच बीड किंवा जालना मार्केटला कोष विक्री करीत असून सध्या 150 अंडीपुंजाची बॅच आहे. त्यापासून किमान १ लक्ष रुपयाचे उत्पादन होईल. पारंपारिक पिकांच्या तुलनेत अतिशय फायद्याची शेती असून वर्षाला किमान ४ ते ५ लक्ष रुपयाचे उत्पन्न घेत आहे, असे सांगितले.

यावेळी वान्मथी सी यांनी कोषांवर पुढील प्रक्रिया कशी होते याची सविस्तर माहिती जाणून घेतली. सद्या शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी दुसऱ्या जिल्ह्यावर किंवा राज्यांवर अवलंबून राहावे लागते. ही अडचण ओळखून रेशीम विकास अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी रेशीम धागा निर्मिती आणि विणकाम युनिट्स जिल्ह्यातच कसे उभारता येतील याबाबत चर्चा केली.

शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या कोषापासून जिल्ह्यातच धागा तयार झाला तर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर अधिक भाव मिळू शकतो असे सांगितले. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांनी गट तयार करुन एकत्र काम केल्यास रेशीम कोष उत्पादनातून गटाचे बळकटीकरण होईल, असेही त्या म्हणाल्या.

रेशीम शेती हा केवळ एक हंगामी व्यवसाय नसून तो एक शाश्वत उत्पन्न देणारा उद्योग आहे. भेटी दरम्यान वान्मथी सी यांनी जिल्ह्यातील चॉकी सेंटरधारक प्रांजल वाघमारे, अनुभवी रेशीम शेतकरी अविनाश वाट यांच्याशीही संवाद साधाला. कमी पाण्यात, कमी मजुरांमध्ये व कमी कालावधीमध्ये उत्पन्न देणारी रेशीम शेती ही अत्यंत किफायतदार शेती आहे. इतर शेतकऱ्यांनीही यातून प्रेरणा घेऊन महारेशीम अभियानात सहभागी व्हावे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 10 एप्रिल पुर्वी नाव नोंदणी करावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, पवनारचे माजी सरपंच श्री. गांडोळे व पवनार येथील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

अधिक वाचा