तमिळनाडू : तमिळनाडूतील साथनकुलम पोलीस कोठडीत पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात हेड कॉन्स्टेबल रेवतीने नोंदवलेली साक्ष निर्णायक ठरली. धमक्या आणि दबाव यांना न जुमानता तिने सत्य उघडकीस आणलं. तिच्या धैर्यामुळे अमानुष कृत्य करणाऱ्या नऊ आरोपी पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या तमिळनाडूच्या साथनकुलम इथल्या पोलीस कोठडीतील पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सीबीआयच्या तपास अहवालाच्या आधारे न्यायालयाने नऊ पोलिसांनी दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षांपूर्वी २०२० मध्ये लॉकडाऊनदरम्यान दुकान उघडल्यामुळे पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी त्यांना रात्रभर कोठडीत निर्घृणपणे मारहाण केली, ज्यामुळे पिता-पुत्राचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. याप्रकरणात रेवती नावाच्या एका महिला कॉन्स्टेबलने दाखवलेल्या शौर्यामुळे नऊ पोलिसांना त्यांच्या क्रूरतेची शिक्षा मिळाली. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेली रेवती कोण आहे, जाणून घेऊयात..
नेमकं काय घडलं होतं?
ही घटना तुतीकुडी जिल्ह्यातील सत्तनकुलम पोलीस ठाण्यात घडली. घटनेच्या वेळी रेवती तिथेच कार्यरत होती. रात्री आठ वाजताच्या सुमारास ती ड्युटीवर आली. त्या दिवशी पोलीस ठाण्यातील वातावरण तिला नेहमीपेक्षा वेगळंच वाटत होतं. लॉकअपमधून तिला किंकाळ्यांचे आवाज, माफीची याचना करणारे आवाज तिला ऐकू येत होते. “साहेब.. कृपया मला जाऊ द्या. मला मारू नका. मला खूप दुखतंय. माझ्याकडून चूक झाली. मी दुकान उघडणार नाही..” अशी विनवणी करणारा आवाज रेवतीच्या कानात घुमत होता. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना पोलीस ठाण्यात इतकी जबर मारहाण करण्यात आली, की ते पुन्हा जिवंत उठलेच नाहीत.
जून २०२० मध्ये करोना महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी दुकानंही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तमिळनाडूतील साथनकुलम इथले व्यापारी पी. जयराज (वय ६२) आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स (वय ३१ ) यांना रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा आरोप करत अटक करण्यात आली. ही घटना उघडकीस येताच तमिळनाडूसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. २४ जून २०२० मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली होती. स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याचं म्हणत न्यायालयाने थेट हा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिला.
साक्षीदार रेवतीची महत्त्वपूर्ण भूमिका
याप्रकरणी जेव्हा न्यायिक दंडाधिकारी एम. एस. भारतीदासन हे तपासासाठी साथनकुलम पोलीस ठाण्यात आले, तेव्हा रेवतीने त्यांना त्या रात्री पोलीस कोठडीत काय काय घडलं, त्याची संपूर्ण माहिती सांगितली. पण त्याचबरोबर तिने त्यांच्याकडून एक वचनही घेतलं. “साहेब, तुम्हाला या प्रकरणाबद्दल जी माहिती हवी, ती प्रत्येक माहिती मी देईन, पण त्याआधी तुम्ही माझ्या पतीच्या, दोन मुलींच्या आणि माझ्या नोकरीच्या सुरक्षेची हमी दिली पाहिजे”, अशी मागणी तिने केली. दंडाधिकाऱ्यांनीही तिला तसं आश्वासन दिलं, त्यानंतर रेवतीने एकामागून एक त्या नऊ पोलिसांची काळी गुपितं उघड केली. रेवती ज्यांच्याविरुद्ध साक्ष देत होती, ते पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी होते. तरीही तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता.
पिता-पुत्राचा लॉकअपमध्ये अमानुष छळ
न्यायिक दंडाधिकारी एम. एस. भारतीदासन यांनी रेवतीला या प्रकरणात सरकारी साक्षीदार म्हणून नियुक्त केलं होतं. बाप-लेकाला पोलीस कोठडीत रात्रभर कसं निर्घृणपणे मारहाण करण्यात आली, लॉकअपमधून त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, त्यांचं शरीर रक्ताने माखलेलं होतं, त्यांना बुटांनी चिरडलं जात होतं आणि हा छळ एक मिनिटासाठीही थांबला नाही, असा धक्कादायक खुलासा रेवतीने तिच्या साक्षीत केला. दोघंही पिता-पुत्र मदतीसाठी याचना करत होते. “आई.. खूप दुखतंय.. मला कृपया जाऊ द्या”, अशी विनवणी ते करत होते. हे दृश्य इतकं भयानक होतं की मी स्वत:ला क्षणभर सावरू शकली नव्हती आणि थोड्या वेळाने पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली, असं रेवतीने सांगितलं.
अमानुष मारहाणीनंतर फरशीवरील रक्त पुसायला लावलं
रेवतीने न्यायाधीशांना सांगितलं की, आरोपी पोलीस अधूनमधून दारू पिण्यासाठी थांबत होते. तिला पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक बालकृष्णन यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. पोलिसांनी पिता-पुत्राला इतकी जबर मारहाण केली होती की, ते दोघं रक्ताने माखलेले होते. अशा परिस्थितीतही पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाने त्यांना जमिनीवरील रक्त स्वच्छ करायला लावलं होतं. यादरम्यान जेव्हा रेवतीने जखमी पी. जयराजसाठी पाणी मागितलं, तेव्हा अधिकाऱ्यांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा दोघांचे हात बांधले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हे दृश्य सहन न झाल्यामुळे पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्याचं रेवतीने स्पष्ट केलं.

गप्प राहण्यासाठी होता दबाव
रेवतीचा साक्ष देण्याचा निर्णय काही सोपा नव्हता. कारण आरोपी अधिकारी तिच्यापेक्षा वरिष्ठ आणि प्रभावशाली होते. पोलीस ठाण्यातील वातावरण याबाबतीत प्रतिकूल होतं. सहकाऱ्यांनी तिच्यावर गप्प राहण्यासाठी दबाव टाकला होता. रेवतीच्या साक्षीच्या वेळी न्यायाधीशांना सुरक्षारक्षकही तैनात करावे लागले. भीती आणि सुरक्षेसाठी तिने अनेकदा साक्ष नोंदवण्यापासून संकोच व्यक्त केला. परंतु जेव्हा तिला सुरक्षेचं आश्वासन मिळालं, तेव्हा तिने साक्ष दिली. तिच्या साक्षीमुळे आरोपींना ओळखण्यास आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यास मोठी मदत झाली.
सहा वर्षांच्या सुनावणीनंतर न्याय
सप्टेंबर २०२० मध्ये सीबीआयने या प्रकरणातील आरोपी पोलिसांना अटक करून चार्जशीट दाखल केलं. निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, उपनिरीक्षक के. बालकृष्णन, हवालदार ए. सामदुराई, हवालदार एस. मुरुगन, शिपाई थॉमस फ्रान्सिस, शिपाई एम. मुथुराजा, शिपाई एस. चेल्लादुराई, शिपाई एस. वैलमुथु अशी आरोपींची नावं आहेत. या प्रकरणातील दहावा आरोपी विशेष उपनिरीक्षक पालदुराई याचा कोठडीत असतानाच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ऑगस्ट २०२२ मध्ये आरोपींविरोधातील सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. सुमारे सहा वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने मार्च २०२६ मध्ये नऊ पोलिसांना दोषी ठरवलं.
रेवतीच्या साक्षीने या खटल्याला आणखी बळकटी मिळाली आणि गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा झाली. सत्य बोलण्याची अनेकदा किंमत मोजावी लागते, म्हणून अनेकजण मौन बाळगणंच पसंत करतात. धैर्याने समोर येणाऱ्यांची संख्या फार कमी असते. परंतु रेवतीने हे धाडस दाखवून सर्वांसमोर एक उदाहरण ठेवलं. तिची साक्ष या प्रकरणात निर्णायक ठरली. धमक्यांना आणि दबावाला न जुमानता ती न्यायाच्या बाजूने पुढे आली. कायदा हातात घेऊन अमानुष कृत्य करणाऱ्या नऊ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळवून देण्यात रेवतीचं योगदान मोलाचं ठरलं.





