अरविंद सावंत मुंबईत परतताच… ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीने महत्त्वाचे पाऊल उचलले.

SHARE:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांचे आठ खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने एक पाऊल उचललं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन भूकंप होणार, उद्धव ठाकरे गटाला आणखी एक हादरा बसणार, ऑपरेशन टायगर होणार अशा चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरु आहेत. उद्धव ठाकरे गटाचे आठ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने तातडीने एक पाऊल उचललं आहे. ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत मुंबईत दाखल होताच लगेच त्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे. अरविंद सावंत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होते ते समजेलच.

काल अनेक वर्तमानपत्रांमध्ये ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. अरविंद सावंत आणि काही खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्यात एका कंपनीत बैठक झाली अशा बातम्या आल्या. त्यानंतर अरविंद सावंत आणि अन्य खासदारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. अरविंद सावंत आता मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर बोलवून घेतलं आहे. मी उद्धव ठाकरे, शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही असं अरविंद सावंत यांनी निक्षून सांगितलं. आता मुंबईत आल्यानंतर ते मातोश्रीवर रवाना झाले आहेत.

निकटवर्तीय, विश्वासू अशी त्यांची ओळख

अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून लोकसभेवर गेले आहेत. 2014 पासून ते खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार अशा चर्चा आहेत. अनेक खासदारांनी काहीही झालं तरी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार नाही असं सांगितलं. अधिवेशन काळात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा खासदारांची मातोश्रीवर बैठक घेतली होती. खासदारांना मार्गदर्शन केलं होतं.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

Leave a Comment

अधिक वाचा