शाळेतील जेवण खाल्ल्याने १०० हून अधिक विद्यार्थी आजारी; एका विद्यार्थिनीचा मृत्यू, दोशींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी

SHARE:

ओडिसा – शिळे अन्न खाल्ल्यानंतर १०० हून अधिक विद्यार्थी आजारी पडले तर इयत्ता पाचवीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रूपाली बसेरा असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील एका सरकारी आदिवासी निवासी शाळेत घडली. या प्रकरणी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाईसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी सकाळी, मयूरभंज जिल्ह्यातील काकाबांधा आश्रम शाळेतील मुलांना नाश्त्यासाठी पखला (आंबवलेला भात), बटाट्याचे भरीत आणि आंब्याची चटणी देण्यात आली. हे जेवण शाळेच्या अधिकृत मेनूमध्ये नव्हते. जेवणानंतर लगेचच मुलांना उलट्या, जुलाब आणि अस्वस्थ वाटू लागले. परिस्थिती हळूहळू इतकी गंभीर झाली की १०० हून अधिक मुलांना तातडीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून, गंभीर अवस्थेतील अनेक मुलांना बारीपाडा येथील पीएमआर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर करावे लागले.

दरम्यान १०० मुलांपैकी एक, इयत्ता ५  वीची विद्यार्थिनी, रूपाली बेसरा हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु प्रयत्न करूनही मंगळवारी सकाळी तिचे निधन झाले. मयूरभंज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेमाकांत साय यांनी रूपाली बेसरा ही विद्यार्थिनीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

या घटनेनंतर, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई आणि दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी रसगोविंदपूर-जलेश्वर रस्ता अडवला. मुलांना शिळे किंवा खराब झालेले अन्न दिले गेले, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या, असा गंभीर आरोप पालकांनी शाळा प्रशासनावर केला आहे. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक, जयंत कुमार पाणीग्रही यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. सरकारने मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई जाहीर केली आहे. वेगवेगळ्या रिपोर्टनुसार ही रक्कम ३ ते ७ लाख रूपयांपर्यत आहे.

मयूरभंजचे जिल्हाधिकारी हेमाकांत साय यांनी सांगितले कि सध्या ६६ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर ४१ जणांना सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. एक वैद्यकीय पथक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले असून, दुसरे पथक शाळेत तळ ठोकून आहे. आणखी अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पोलीस तपासाव्यतिरिक्त, आम्ही स्वतंत्र चौकशी देखील करू, या घटनेसाठी जबाबदार असलेल्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मृत विद्यार्थ्याच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा