यवतमाळ – काही महिन्यांपूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दावा केला होता कि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न झाले आहे. मात्र केंद्र सरकारच्या या दाव्यानंतरही महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान या एप्रिल २०२६ मधील केवळ २५ दिवसांत १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे जिल्हा प्रशासन हादरले असून, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख पुसण्याचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसत आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांचे उत्पन्न घटल्याने कर्जबाजारीपणा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. लहरी हवामानामुळे होणारे पिकांचे नुसार, सातत्याने होणारी नापिकी, मालाला भाव नसणे, वाढता लागत खर्च, कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
मारेगाव तालुक्यातील पार्डी व सुर्ला या गावातील दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लागोपाठ गळफास लावून आत्महत्या केली. पार्डी येथील कैलास चंद्रभान गाडगे यांनी २१ एप्रिलला सकाळी शेतात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. कपाशीचे अवशेष जाळण्याच्या निमित्ताने शेतात गेलेल्या गाडगे यांनी झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याच दिवशी सुर्ला येथील विलास हरिचंद्र मेश्राम हे शेतकरी रात्रीच्या सुमारास घरातून बाहेर पडले. मात्र, ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता बुधवारी त्यांनी झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले.
केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असल्याचा दावा करत असले तरी महाराष्ट्रा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबून राहिलले नाहीत. यवतमाळ जिल्हयात यावर्षीच्या जानेवारी अवघ्या ३१ दिवसांत २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर २०२५ या वर्षात जिल्ह्यात ४४६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असून आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ३० ते ५० वयोगटातील आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. या घटनांमुळे संताप व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.






