बनावट आयएएस अधिकारी भासवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; विप्रा शर्मा, दीक्षा पाठक आणि शिखा पाठक यांना अटक

SHARE:

नवी दिल्ली – बरेलीच्या बारादरी परिसरात बनावट आयएएस आणि आयपीएस टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही टोळी आयएएस आणि एडीएम दर्जाचे अधिकारी असल्याचे भासवून सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची लाखो रूपये उकळत होती. या टोळीत समावेश असलेल्या विप्रा शर्मा, दीक्षा पाठक आणि शिखा पाठक यांना पोलिसांनी रूहेलखंड दंत महाविद्यालयाजवळ अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा असलेले अंदाजे ५५ लाख रुपये जप्त केले.

पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की या संपूर्ण टोळीची सूत्रधार विप्रा शर्मा तिच्या वाहनावर एडीएम नावाची पाटी आणि निळा दिवा लावून फिरत असे. लोकांमध्ये आपले वर्चस्व आणि प्रभाव प्रस्थापित करणे हा यामागील उद्देश होता. या महिलांनी लोकांचा विश्वास संपादन केला कि त्यांचा सरकारमधील उच्च पदांवर संपर्क आहे आणि त्या पैशांच्या बदल्यात कोणालाही सरकारी नोकरी मिळवून देऊ शकतात. या फसवणुकीला बळी पडून, अनेक बेरोजगार तरुणांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि लाखो रुपयांच्या घोटाळ्याचे बळी ठरले. पीडितांसोबतच्या बैठकांमध्ये उपस्थित असलेल्या आरोपीच्या वडिलांची भूमिकाही उघडकीस आली आहे.

तपासात असे उघड झाले की आरोपी पीडितांना आपल्या घरी बोलावून त्यांच्यात विश्वास निर्माण करून, नंतर बँक व्यवहार आणि रोख रकमेद्वारे पैसे उकळत असत. प्रीती लॉयलने एका बँक खात्यात अंदाजे २ लाख रुपये हस्तांतरित केले, तर आदिल खानने १.८० लाख रुपये, संतोष कुमारने २ लाख रुपये आणि मुशाहिद अलीने ५.२१ लाख रुपये रोख स्वरूपात दिले.

या टोळीतील महिलांनी बनावट नियुक्तीपत्रे तयार करून ती पीडितांना पाठवली. पीडितांना पटवून देण्याच्या उद्देशाने ही पत्रे लखनौच्या महसूल परिषदेच्या नावाने तयार करून ईमेल, व्हॉट्सॲप आणि पोस्टाने पाठवण्यात आली होती. जेव्हा हे तरुण नोकरी स्वीकारण्यासाठी लखनौला आले, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी सर्व नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा पीडितांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा त्यांना धमकावून परत पाठवण्यात आले. यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

पोलिसांच्या तपासात असेही उघड झाले आहे की विप्रा शर्मा, दीक्षा पाठक आणि शिखा पाठक या आरोपी महिला लोकांना प्रभावित करण्यासाठी आपल्या गाडीवर एडीएमची प्लेट आणि निळा दिवा लावून फिरायची. चौकशीदरम्यान, या टोळीची मुख्य सूत्रधार आणि मुख्य आरोपी विप्रा शर्मा हिने आयएएस अधिकारी होण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. तिने आग्रा येथून पीएचडी आणि रोहिलखंड विद्यापीठातून डबल एमए केल्याचा दावाही केला, ज्याचा वापर ती लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी करत असे.

पीडितांनी पोलिसांना सांगितले की माहिती गोळा केल्यावर त्यांना समजले की या संपूर्ण खेळात दोन्ही बहिणी आणि त्यांचे कुटुंबीयही सामील होते. असे सांगण्यात आले की विप्रा शर्मा आणि शिखा पाठक अशा प्रकारे लोकांना जाळ्यात अडकवून पैसे उकळतात. या दोन्ही बहिणींनी इतर अनेक लोकांचीही फसवणूक केली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. यासोबतच, १० चेकबुक, ४ मोबाईल फोन एक महेंद्रा एक्सयूव्ही कार, दोन लॅपटॉप, ४.५० लाख रुपये रोख, ३ पासबुक आणि विविध खात्यांमधील ५५ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.

सर्कल ऑफिसर पंकज श्रीवास्तव यांनी सांगितले की बारादरी पोलीस ठाण्यात मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, सुरुवातीला दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर, तपासाअंती डॉ. विप्रा शर्मा, शिखा पाठक आणि दीक्षा पाठक यांना अटक करण्यात आली. सध्या, पोलीस या संपूर्ण नेटवर्कचा तपास करत असून, या टोळीने आणखी किती लोकांना लक्ष्य केले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा