पूणे – देशातील महागाई, बेरोजगारी, उपासमारी, महिलांवरल लैंगिक शोषण, या खर्या मुद्यांवरून सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप नेत्यांकडून सातत्याने हिंदू- मुस्लिम मुद्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान पूणे शहरात असाच एक मुद्या उपस्थित करत शहरातील कोंढवा परिसराला ‘पाकिस्तानचे कराची’ असे संबोधले. याचा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरला झाल्यानंतर या प्रकरणी भाजप पदाधिकारी सर्वेश मेहंदळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप पुणे शहर युवा शाखेचा खजिनदार सर्वेश मेहंदळे यांनी एका व्हिडिओमध्ये कोंढव्याचा उल्लेख ‘पाकिस्तानचे कराची’ असा केला होता. यामुळे कोंढवा भागात संतापाची लाट उसळली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी कोंढवा पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करून कारवाईची मागणी केली. लोकांचा रोष पाहून कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत व्हिडिओ व्हारयल झाल्याच्या दोन दिवसानंतर सर्वेश मेहंदळे याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांनी सर्वेश मेहंदळे विरोधात बीएनएसच्या कलम ३५३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील मुख्य रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या इमारतीतून सर्वेश मेहेंदळे यांनी एक व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये ते हॉस्पिटलच्या बाहेरील कथित अतिक्रमणांबाबत माहिती देत होते. मात्र, या व्हिडिओला त्यांनी ‘वेलकम टू कोंढवा ऑफ पाकिस्तान’ असे कॅप्शन दिले होते आणि बोलताना या परिसराचा उल्लेख ‘कराची’ असा केला होता. या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.
व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की रुग्णालय परिसराच्या आजूबाजूला बेकायदेशीर दुकाने आणि तात्पुरते हातगाडे लावले गेले आहेत, जे नियमांचे आणि न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन करत आहेत. इतकेच नव्हे तर रुग्णालय परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्या असल्याचे दाखवून रुग्णालय संचालकांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या तक्रारींमध्ये धार्मिक संदर्भ जोडत मुस्लिम समुदायाचे लोक एका हिंदू व्यक्तीला त्रास देत असल्याचा दावा करण्यात आल्याने स्थानिक स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. या व्हिडिओचा मूळ उद्देश रुग्णालयातील समस्या मांडण्याऐवजी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे आणि परिसराची शांतता भंग करणे असा असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. अखेर या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी सर्वेश मेहंदळे विरोधात बीएनएसच्या कलम ३२३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील कोंढवा भागात घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. भाजपकडून सातत्याने या भागाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे निंदनीय आहे. प्रशासनाने आणि सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा सामाजिक सलोखा बिघडण्यास हे लोक कारणीभूत ठरतील. असा आरोप करत काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रशांत जगताप यांनी सर्वेश मेहंदळे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.






