परभणी – नुकतचं प्रहार जनशक्तीचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी ३० एप्रिल रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मी शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेत आहे, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलय. मात्र परभणीत बच्चू कडू यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाला कडाडून विरोध केला जात आहे. परभणी जिल्ह्यात या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहे.
प्रहारचे परभणी जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीने या एकतर्फी निर्णयाचा विरोध करत शिवसेना शिंदे गटात विलीन होण्यास नकार दिला आहे. ज्या पक्षासाठी अनेक वर्षे संघर्ष केला आणि आंदोलने केली, तो पक्ष अचानक दुसऱ्या पक्षात विलीन केल्याने निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले असून अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हा निर्णय घेताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप जिल्हा कोअर कमिटीने केला आहे. भविष्यातील राजकीय दिशा ठरवण्यासाठी दोन-तीन दिवसांत तालुकास्तरावर दौरे करून स्वतंत्र निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कडू यांनी राजकीय स्वार्थासाठी पक्षाच्या संघर्षशील कार्यकर्त्यांचा बळी दिल्याचा आरोप जिल्हाप्रमुख बोधने यांनी केला. बच्चु कडू यांच्या निर्णयामुळे पक्षाच्या मेहनतीला पाणी सुटले. त्यांच्यासोबत कोणताही राजकीय समन्वय न ठेवता हा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांचा निषेध करण्यास आम्ही मजबूर झालो, असे बोधने यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या असंतुष्ट गटाने एका बैठकीत ठरवले की जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन होणार नाही आणि त्यांच्यासोबत कोणत्याही राजकीय आघाडीची चर्चा होणार नाही.
आगामी राजकीय दृष्टिकोन ठरवण्यासाठी जिल्हा कोअर कमिटी सदस्यांनी तालुक्यांमध्ये दौऱ्याचे नियोजन केले. या दौऱ्यात सर्व स्थानिक प्रमुखांशी चर्चा करून भविष्यातील राजकीय दिशा निश्चित केली जाईल. त्यासोबतच, आगामी निर्णयांच्या आधारावर प्रहार जनशक्ती पक्ष हा स्वतःचे राजकीय अस्तित्व कायम ठेवणार की इतर गटात विलीन होईल, यावर मोठा निर्णय घेतला जाईल. या निर्णयाची घोषणा येत्या काही दिवसांत केली जाणार आहे.
पक्षप्रवेशानंतर शिवसेनेने बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन नव्या वाटचालीस सुरुवात केली असून, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शेतकरी संवाद अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात बच्चू कडू यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.






