नवी मुंबई – आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातून समोर आला आहे. या घटनेमुळे बाजारातील फळांच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आपण जे खातो ते सुरक्षित आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. या घटनेने बाजार समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वाशीमधील एपीएमसी बाजारात काही व्यापारी उघडपणे आंब्यांवर रसायनांची फवारणी करत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी असे रासायनिक आंबे तुम्ही तुमच्या मुलांना खायला द्याल का? असा जाब विचारला असता, संबंधित व्यापाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. ही माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासन आणि एपीएमसी प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बाजारात छापा टाकला. संशयित व्यापाऱ्यांकडून आंब्यांचे नमुने जप्त करण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेने बाजार समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उन्हाळ्यात मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आंबे येतात, लोक आवडीने ते खरेदी करतात. पण केमिकल आंब्यामुळे लोकांच्या जिव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे आंबा खरेदी करण्याआधी तो केमिकल युक्त आहे का? हे तपासून पाहावे. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याचा रंग सगळीकडे एकसारखा नसतो. मात्र, रसायनाने पिकवलेला आंबा पूर्णपणे गडद पिवळा दिसतो. नैसर्गिक आंब्याला एक विशिष्ट गोड सुगंध येतो. जर आंब्याला अजिबात वास येत नसेल किंवा औषधांसारखा वास येत असेल, तर तो केमिकलचा असू शकतो.
मुंबईत टरबूज खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर हा प्रकार समोर आला आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक गंभीर मानला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून या घटनेमुळे बाजारात मिळणाऱ्या फळांचा दर्जा आणि सर्वसामान्यांचे आरोग्य यांबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
माहित असावे कि आंबे रातोरात पिवळे करण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड यासारख्या घातक रसायनांची फवारणी केली जाते. या रसायनांमुळे पचनसंस्थेचे विकार, त्वचेची ॲलर्जी, उलट्या आणि गंभीर आजार होण्याची शक्यता असते.






