कोल्हापूर – जिल्ह्यात रविवारी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान काही केंद्रांवर गोंधळ झाल्याचे समोर आले. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत पालकांनी संताप व्यक्त केला. इचलकरंजी येथील एएससी कॉलेज केंद्रावर एका विद्यार्थ्याला पाण्यासाठी बाहेर गेल्यानंतर पुन्हा प्रवेश नाकारण्यात आला. बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण झालेली असतानाही विद्यार्थ्याला आत घेण्यास मज्जाव केल्याने पालकांनी तीव्र आक्षेप घेतला. तर कोल्हापुरातील एका केंद्रावर तपासणी प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचा सुमारे १० मिनिटांचा वेळ वाया, अशी तक्रार पालकांनी केली.
देशभरात सुमारे २२.०९ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली असून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत नोंदणी कमी झाल्याचे दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यात 13 केंद्रांवर परीक्षा संपन्न झाली असून सुमारे ६ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, काही केंद्रांवर उत्तरपत्रिकेवरील माहिती लिहिण्याच्या प्रक्रियेतही गोंधळ झाल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त मानसिक ताण सहन करावा लागला.
इचलकरंजीतील घटनेत संबंधित विद्यार्थ्याचे बायोमेट्रिक पूर्ण झाल्यानंतर तो बाहेर कसा गेला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) नियमांनुसार, एकदा बायोमेट्रिक पूर्ण झाल्यावर आणि परीक्षेच्या वेळेत विद्यार्थ्याला विनाकारण रोखणे चुकीचे आहे. या प्रकाराची चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आता पालक करत आहेत.
पेपरच्या स्वरूपाबाबत वैद्यकीय समुपदेशक अशोक शेट्टी यांनी सांगितले की, यंदाचा पेपर ‘मॉडरेट’ स्तराचा असला तरी तो खूपच प्रदीर्घ होता. जीवशास्त्र विभाग तुलनेने सोपा पण स्टेटमेंट-आधारित होता, तर भौतिकशास्त्र सर्वाधिक कठीण आणि वेळखाऊ ठरला. रसायनशास्त्र विभाग एनसीईआरटी-आधारित असला तरी काही गणिती प्रश्नांनी विद्यार्थ्यांना अडचणीत टाकले.
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) देशभर एकाचवेळी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला जीवशास्त्र हा मुख्य विषय असून त्या अंतर्गत वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र हे विषय असतात. तसेच रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रही असते. एकूण परीक्षा ७२०गुणांची असते.






