संभाजीनगर – राज्यांतील निवडणुकीचा धुराळा खाली बसला. भाजपने मोठी मुसंडी मारली. तर त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर येथील एका बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. “तुमको क्या लगता था नही लौटेंगे, लो फिर आ गये” असा आशय या बॅनरवर आहे.
“तुमको क्या लगता था नही लौटेंगे, लो फिर आ गये” या बॅनरची राज्यभरात चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे. या बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे सेना आणि भाजपला खोचक टोला लगावला आहे. नुकताच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांची यावेळी विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे यंदा विधान परिषदेची निवडणूक सर्व पक्षांच्या समन्वयातून बिनविरोध झाली आहे.
क्रांती चौकातील बॅनरची चर्चा
अंबादास दानवे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर आज त्यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य रॅली काढत स्वागत करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील क्रांती चौकात अंबादास दानवे यांचे एक बॅनर सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. याचे कारणही तसेच आहे या बॅनरवर नवाजुद्दीन सिद्दिकी यांचा हिंदी पिक्चरचा डायलॉग “तुमको क्या लगता था नही लौटेंगे, लो फिर आ गये” असे म्हणत शिंदे यांची शिवसेना आणि भाजप वर निशाणा साधत खोचक इशारा देण्यात आला आहे.
बाळासाहेबांचा निष्ठावंत, कुणाला डिवचले
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार आणि काही खासदारांसह भाजपसोबत महायुतीचे सरकार आणले. २०२२ मधील या राजकीय भूकंपाने राज्यच नाही तर देश हादरला. पुढे २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. पण महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मोठा टक्का आहे. पक्षावर संकटं आली तरी पक्ष निष्ठा सोडली नसल्याचा उल्लेख दानवे यांच्यासाठी लावण्यात आलेल्या या बॅनरवर आहे. दानवे यांच्या चाहत्याने आणि कार्यकर्त्याने हे बॅनर लावलेले आहे. वादळतही ठाम उभा, बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक जिद्दीचा असाही उल्लेख या बॅनरवर आहे. यातून त्यांनी शहरासह राज्यातील शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना डिवचले आहे. दानवे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची लॉटरी लागली आहे. यापूर्वी ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी सभागृह गाजवले. यंदा उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील असा अंदाज बांधल्या जात होता. पण तो खोटा ठरला. काँग्रेसने काही तास संताप व्यक्त केला. पण अखेरच्या टप्प्यात त्यांनी दानवेंच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आज दानवे यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीने मराठवाड्यातील प्रश्नांना विधीमंडळात वाचा फुटेल असे अनेकांना वाटत आहे.






