बालसंगोपन योजनेचा निधी लाडकी बहिण योजनेकडे वळवला; अनाथ मुले सरकारी मदतीपासून वंचित

SHARE:

मुंबई – राज्यातील महायूती सरकारने महिलांची मते घेण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली, मात्र तिजोरी खडखडाट असल्याने लाभार्थी महिलांना हप्ते देताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सरकारला इतर योजनांचा निधी लाडकी बहिण योजनेकडे वळवावा लागत आहे. गेल्या वर्षी एससी/एसटीच्या विकासाचा निधी लाडकी बहिण योजनेकडे वळवला होता. यावरून एससी/एसटीच्या लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. आता राज्य सरकारने बालसंगोपन योजनेचा निधी लाडकी बहिण योजनेकडे वळवल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे राज्यातील जवळपास 1.75 लाख अनाथ मुले गेल्या एका वर्षांपासून सरकारी मदतीपासून वंचित आहेत.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, असा आरोप आहे कि राज्यातील महायूती सरकारने लाडली बहन योजनेकडे अनाथ मुलांसाठी असलेला निधी वळवला. त्यामुळे राज्यातील जवळपास 1.75 लाख अनाथ आणि निराधार मुले गेल्या वर्षभरापासून सरकारी मदतीपासून वंचित आहेत. यामुळे हजारो मुलांचे शिक्षण थांबले आहे, अनेकांकडे औषधांसाठी पैसे नाहीत आणि अनेक जण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत आहेत.

राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालसंगोपन योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ, निराश्रित, बेघर किंवा दुर्धर आजारी व कैद्यांच्या मुलांना संस्थेत न ठेवता कौटुंबिक वातावरणात वाढवण्यासाठी दरमहा प्रतिबालक 2,250 रुपये आर्थिक दिली जाते. दुसरीकडे, कोरोना काळात 0 ते 18 वर्षे वयोगटातील ज्या चिमुकल्यांचे दोन्ही पालक मृत पावले, त्यांना दरमहा 4,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जेणकरून त्यांचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे व्हावा. मात्र, राज्य सरकारकडून या अनाथ आणि निराधार चिमुकल्यांना 12 महिन्यांपासून एक दमडीही मिळाली नाही. शासनाकडून वेळेवर अर्थसाहाय्य न मिळाल्यामुळे हजारो मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, बालसंगोपन योजनेचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आल्याची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या निधीच्या कमतरतेमुळे कोरोना काळात अनाथ झालेली निष्पाप मुलेही आता सरकारी मदतीपासून वंचित राहिली आहेत. मुलांच्या संगोपनासाठी लाभार्थ्यांचे नातेवाईक गेल्या अनेक महिन्यांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा