बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटचा भांडाफोड; भाजपचे कार्यकर्ते असलेल्या डॉक्टरसह चार जणांवर गुन्हा दाखल

SHARE:

वाशिम – गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीही काही केंद्रांवर छुप्या पद्धतीने हे कृत्य सुरू असल्याचे सातत्याने समोर येत आहे. बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर नंतर आता वाशिमच्या मालेगावमध्ये बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणात भाजप पदाधिकारी तथा माजी सरपंच डॉ. विवेक माने यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आरोग्य विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव शहरातील भाजप पदाधिकारी आणि माजी सरपंच डॉ. विवेक माने यांच्या दवाखान्यावर आरोग्य विभागाने छापा टाकत बेकायदा स्त्री भु्रणलिंग चाचणी प्रकरणाचा भंडाफोड केला. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत डॉ. विवेक माने, यांच्यासह अज्ञात महिला डॉक्टर आणि इतर तिघांविरोधात मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

डॉ. विवेक माने यांच्या पत्नी शिवगामी माने यांचे नावे दवाखाना आणि सोनोग्राफी सेंटर आहे. मात्र, आरोप पत्रात एफआयआरमध्ये नाव अज्ञात नमूद असल्याचे समोर आले आहे. डॉ. विवेक माने हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असुन 2009 पासून वाशिम विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अनेक राजकीय बड्या नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती मोठी असूनही, राजकीय दबावामुळे मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टरच्या पत्नीचे नाव एफआयआरमधून डावलण्यात आल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

यापूर्वी देखील बीड, छत्रपती संभाजीनगर नंतर अहिल्यानगर जिल्हयातील राहता तालुक्यात बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांच्यासह इतर डॉक्टर व एजंटांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती थेट नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तब्बल 18 वर पोहोचली असून, त्यात 6 डॉक्टरांचा समावेश आहे.

मुलींचे कमी होत असलेलेे प्रमाण लक्षात घेता गरोदरपणात व बाळंतपणाच्या आधी गर्भलिंग तपासणी करून घेणे आणि मुलीचा गर्भ असेल तर पाडणे हा गुन्हा आहे. मात्र यानंतरही राज्यात काही केंद्रांवर छुप्या पद्धतीने हे कृत्य सुरू असल्याचे सातत्याने समोर येत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा