मुंबई – बकरीदच्या पार्श्वभूमीवर मुंबईजवळील मीरा रोड येथील एका गृहनिर्माण सोसायटीत निर्माण झालेल्या तणावाचा व्हिडिओ 26 मे रोजी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी गर्दीतून डुक्कर घेऊन जाताना दिसत होता, तर अनेक लोक ते डुक्कर पोलिसांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते. घटनास्थळी गोंधळ, घोषणाबाजी आणि माध्यमांची धावपळ दिसून आली.
हा प्रकार मीरा रोडमधील पूनम क्लस्टर-1 या गृहनिर्माण सोसायटीत घडला. सुमारे 600 हून अधिक फ्लॅट्स असलेल्या या सोसायटीत हिंदू-मुस्लिम कुटुंबे जवळपास समान संख्येने राहतात. स्थानिक रहिवाशांच्या मते, येथे अनेक वर्षांपासून सर्व धर्मांचे सण शांततेत साजरे होत आले आहेत. यंदाही मुस्लिम रहिवाशांनी बकरीदपूर्वी कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांना ठेवण्यासाठी सोसायटी व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या जागेवर तात्पुरता मंडप उभारला होता. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष कुर्बानी सोसायटीबाहेर महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच होणार होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बकरीदच्या 10 ते 12 दिवस आधी मुस्लिम कुटुंबे बकरे आणू लागली होती. सोसायटीतील एका रहिवाशाने सांगितले की ही संपूर्ण प्रक्रिया उत्सवासारखी असते आणि आतापर्यंत कुणालाही त्याबाबत आक्षेप नव्हता. मात्र यंदा ब्राह्मण समाजातील तीन कुटुंबांनी मंडपाच्या जागेबाबत आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 22 मे रोजी सोसायटीला भेट देऊन ताडपत्री काढण्याचे निर्देश दिले. 25 मे रोजी पुन्हा भेट देऊन बांबूचे स्ट्रक्चरही हटवण्यास सांगण्यात आले. रहिवाशांच्या मते, याबाबत कोणताही अधिकृत लेखी आदेश देण्यात आला नव्हता.
रहिवाशांचा आरोप आहे की हा वाद शांत झाल्याचे वाटत असतानाच 26 मे रोजी सोसायटीबाहेर मोठी गर्दी जमली आणि त्या गर्दीसोबत डुक्कर आणण्यात आले. यावेळी हनुमान चालीसाचे पठणही करण्यात आले. स्थानिकांच्या दाव्यानुसार, गर्दीत सहभागी झालेले अनेक लोक बाहेरून आले होते. काही रहिवाशांनी आरोप केला की या समूहाचा संबंध बजरंग दल आणि व्हिएचपी या संघटनांशी होता.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की डुक्कर आणण्याच्या घटनेच्या आदल्या दिवशी बजरंग दलाचे स्थानिक नेते पवन ठाकूर आणि काही कार्यकर्ते सोसायटीत आले होते. आणि त्यांनी अंतर्गत व्यवस्थेत अडथळा आणायला सुरुवात केली. काही तासांनंतर, आणखी एक उजव्या विचारसरणीचे नेते नागनाथ कांबळे हे देखील या गोंधळात सामील झाले आणि लवकरच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. एका उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्याने दावा केला की त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, ज्याला स्थानिकांनी सोसायटीत राहणाऱ्या मुस्लिमांना अटक करवून घेण्याचा एक डाव असल्याचे म्हटले आहे.
या घटनेनंतर मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील मुस्लिमबहुल भागांमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली. दरम्यान राजकीय वक्तृत्वाने या वादाला खतपाणी घातले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना, बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय म्हणाले कि जर अल्पसंख्याक समुदायाने नियम पाळले नाहीत, तर आम्ही गप्प बसणार नाही. जर त्यांनी नियम मोडले आणि बकऱ्या आणल्या, तर आम्ही बकरीदच्या दिवशी डुकरे आणून त्यांना प्रत्युत्तर देऊ.
दरम्यान, या घटनेचा परिणाम शहरातील इतर गृहनिर्माण सोसायट्यांवरही झाला असून, काही ठिकाणी बकरे ठेवण्यास दिलेली परवानगी मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर भाजप नेते किरिट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्राण्यांची कुर्बानी रोखण्याची मागणी केली. मात्र स्थानिक मुस्लिम रहिवाशांनी हा आरोप फेटाळून लावत सोसायटीच्या आत कुर्बानी दिली जात नाही, फक्त बकरीदपूर्वी काही दिवस बकऱ्या ठेवण्यासाठी ही जागा वापरली जाते, असे स्पष्ट केले.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.







1 thought on “बकरीईद निमित्त कुर्बानीला विरोध; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून डुकरांसह निदर्शने”
93jiliph’s been good to me. Simple interface, decent payout. I will keep coming back. Check it out yourself here: 93jiliph