अमरावती – महिलांची मते लाटण्यासाठी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायूती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली आणि अर्जाची पडताळणी न करता सरसकट लाभ देणे सुरू केली. मात्र तिजोरीवर ताण आल्यानंतर सरकारने त्यांची पडताळणी सुरू केली आणि ईकेवायसी बंधनकारक केली. त्यामुळे ईकेवायसी पडताळणीनंतर राज्यातील 70 लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद झाला. दरम्यान अमरावती जिल्हयात लाडक्या बहिणींना मोठा धक्का लागला आहे. जिल्ह्यात 1 लाख 21 लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
लोकसभा निवडणकीत महायूती सरकारला जोरदार फटका बसला. विधानसभेला हा फटका बसू नये म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आणि अर्जाची पडताळणी न करता 1500 रूपयांचा लाभ देणे सुरू करण्यात आले. यामुळे तिजोरीवर ताण आला. महिलांना हप्ते देताना सरकारची दमछाक होऊ लागली. महिलांना हप्ते देण्यासाठी अनु.जाती आणि अनु.जमातींच्या कल्याणाचा निधी लाडकी बहिण योजनेकडे वळवण्यात आला.
यामुळे देखील सरकारची डोकेदुखी कमी झाली नाही. यानंतर जाग आलेल्या सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत ईकेवायसी अनिवार्य करण्यात आली. या ईकेवायसीनंतर राज्यात 70 लाखांपेक्षा जास्त महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवून त्यांचा लाभ बंद करण्यात आला. यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यातील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर येत आहे.
या आकडेवारीनुसार एकट्या अमरावती जिल्ह्यातील तब्बल एक लाख 21 हजार 818 महिलांना या योजनेतून अपात्र घोषित करून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे. ईकेवायसी न करणे, वयोमर्यादा, घरातील चारचाकी वाहन, केवायसी त्रुटी, एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिलांनी लाभ घेणे आदी कारणामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यापूर्वी अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 66,818, तर दुसर्या टप्प्यात 55 हजार महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. म्हणजे अमरावती जिल्हयात एकूण एक लाख 21 हजार 818 महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात आले आहे.
अमरावतीमध्ये एका कुटुंबातील 49,493 महिलांनी लाभ घेतल्याचे पडताळणीत उघड झाले आहे. यामुळे सध्या त्यांची पडताळणी सुरू असून अनेक महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






