आदिवासी शेतकऱ्याची ५० लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

SHARE:

मुंबई – पालघर जिल्ह्यातील वाढवन बंदर प्रकल्पासाठी एका आदिवासी शेतकर्याची जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा मोबदला म्हणून शेतकर्याच्या बँक खात्यात जवळपास 2 कोटी 91 लाख रूपये जमा होणार होते. मात्र अडाणीपणाचा फायदा घेत शेतकर्यांच्या खात्यातून न कळत परस्पर 50 लाख 27 हजार रूपये काढून घेतल्याचे समोर आले आहे. या फसवणूकप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील तवा गावातील शेतकरी किरण पालवा यांची जमीन ग्रीनफिल्ड महामार्ग (वाढवण बंदर) प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा मोबदला म्हणून जवळपास 2 कोटी 91 लाख रूपये त्यांच्या खात्यात जमा होणार होते. ही रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र, कासा शाखेतील खात्यात जमा होणार होती. मात्र, आरोपी सुरज गिंभल, धर्मा वळवी आणि प्रसाद उर्फ मॉन्टी पाटील यांनी फिर्यादीच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेत मोबदल्याची रक्कम लवकर मिळवून देतो असे सांगून त्यांना बोईसर येथील बँकेत नेले.

तेथे विविध कागदपत्रांवर सही व अंगठ्याचे ठसे घेऊन फिर्यादीच्या खात्याशी स्वतःचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी जोडल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या नकळत त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी तब्बल 50 लाख 27 हजार 760 रुपये काढून आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले.

या रकमेतून सोन्याचे दागिने, कपडे खरेदी तसेच इतर व्यवहार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, मोबदल्याची रक्कम जमा होऊनही अनेक महिने फिर्यादींना याची माहिती मिळाली नव्हती. अखेर खात्यातील व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली 27 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस आरोपींचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे वाढवण बंदर प्रकल्पातील जमीन मोबदल्याच्या व्यवहार फसवणुकीबाबत ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली असून वाढवण बंदर प्रकल्पातील भूमी संपादन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment