काकाच ठरला काळ: पाच वर्षांच्या पुतण्याचा गळा आवळून खून, आरोपीला बेड्या

SHARE:

सोलापूर – सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याची गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून आरोपीला अटक केली आहे. अंकुश परशुराम कास्तार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. समर्थ कास्तार असे मृत मुलाचे नाव आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या अनैतिक संबंधाचे गुपित उघड होईल या भीतीने एका सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याचा खून केला आहे.

या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. काकाने आपल्या पाच वर्षांच्या पुतण्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधांचे गुपित उघड होईल या भीतीने आरोपीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांचा मूलगा समर्थ हा नेहमीप्रमाणे आपल्या काकाच्या घरी जात असल्याचे घरच्यांना सांगून घरातून बाहेर पडला होता.

मात्र, काकाच्या घरात समर्थने असे काहीतरी पाहिले जे आरोपी अंकुश कास्तार ला सर्वांपासून लपवून ठेवायचे होते. अंकुशचे एका स्त्रीसोबत अनैतिक संबंध होते. समर्थने या अनैतिक संबंधांचे गुपित पाहिल्यामुळे, हा प्रकार आता घरातल्या सगळ्यांना कळेल याच भीतीपोटी आणि रागाच्या भरात त्याने समर्थचा गळा आवळून खून केला. पुतण्याचा जीव घेतल्यानंतर आरोपी काकाने एक खोटा ड्रामा रचला. तो समर्थला कडेवर घेऊन त्याच्या आजीकडे गेला.

समर्थ खेळताना घराच्या पत्र्यावरून खाली पडला आणि त्यामुळेच तो बेशुद्ध झाला आहे, असा खोटा बनाव अंकुशने केला. घरच्यांनी समर्थला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर समर्थच्या मृतदेहाचे निरीक्षण केले असता, त्याच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा, हनुवटीवर आणि डोळ्याजवळ काही संशयास्पद जखमा दिसून आल्या.

पत्र्यावरून पडल्यास अशा जखमा होणे शक्य नसल्याने कुटुंबीयांना आणि पोलिसांना अंकुशवर संशय आला. संशयाच्या आधारे पोलिसांनी अंकुशला अटक केली. पोलिस चौकशीत अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीनेच आपण समर्थचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सोलापूर पोलिस करत आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment