अमरावती : नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती यांच्या वतीने महान स्वातंत्र्यसैनिक, जननायक व क्रांतिकारी योद्धा बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त माल्यार्पण व पुष्पार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महावीर नगर, अमरावती येथे सकाळी 9.00 वाजता अत्यंत श्रद्धापूर्वक व मर्यादापूर्वक पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पुष्पार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या जीवनकार्याचा, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेल्या संघर्षाचा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला.
उपस्थित वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध तसेच अन्याय, शोषण आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देत आदिवासी समाजात स्वाभिमान, संघटन आणि स्वातंत्र्याची चेतना निर्माण केली. त्यांनी अल्पवयातच जनतेला संघटित करून अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध व्यापक जनआंदोलन उभारले. त्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी ऊर्जा मिळाली. त्यांचे विचार आजही युवकांना राष्ट्रप्रेम, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बिरसा मुंडा यांच्या त्याग, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा प्रसार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे “इंकलाब जिंदाबाद”, “महान क्रांतिकारी बिरसा मुंडा अमर रहे”, “महान क्रांतिकारी बिरसा मुंडा के विचारों को गांव-शहर में फैला दो”, “नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती जिंदाबाद” तसेच “महान क्रांतिकारी बिरसा मुंडा के जीवन चरित्र से छात्र-नौजवान सीख लें” अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. घोषणांमधून बिरसा मुंडा यांच्या विचारांप्रती आदर व त्यांच्या क्रांतिकारी वारशाबद्दलची बांधिलकी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास समितीचे सन्माननीय गणेश मुंधरे, सतीश ढोरे, प्रियंका मुंधरे, निलू दास, किशोर पेंढारकर, रुपेश वानखडे, माही वानखडे, स्वरा साबे, वीरा हनवते, मसिरा शेरखान, कौतुक चोरे, ईश्वरी हटवार, गौरी बिलगये, सक्षम ढेवले, स्वरा ढेवले, सार्थक कोराम, निधी दुबे, हंसिका चौव्हाण, प्रांजली राऊत, आराध्या मंडाले, कृष्णा अग्रवाल, गौरी हिरोळे, सबुरी जावरकर, सत्या मुंधरे तसेच समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






