अल्पवयीन मुलीला व्यसनाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; धक्कादायक ड्रग्ज रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड

SHARE:

जळगाव – अल्पवयीन मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. जळगावातील अमली पदार्थांचे व्यसन व मुलीवर अत्याचार या प्रकरणात प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहरात अल्पवयीन मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि ड्रग्ज रॅकेटच्या प्रकरणात या गुन्ह्याशी संबंधित संशयित आरोपींच्या अवैध मालमत्तांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. सोमवारी रात्री जळगाव महापालिका आणि औद्योगिक वसाहत पोलिसांच्या संयुक्त पथकाने सुप्रीम कॉलनी परिसरात कडक कारवाई करत ड्रग्ज रॅकेटमधील संशयित आरोपीच्या घरासमोरील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले आहे. जळगाव औद्योगिक वसाहत पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटशी संबंधित 6 जणांच्या मालमत्तांची माहिती गोळा करून त्या कायदेशीर आहेत की नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाला पत्र दिले होते.

त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणांची पाहणी केली असता, काही बांधकामे अनधिकृत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.त्यानंतर सोमवारी रात्री महापौर दीपमाला काळे, महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह मोठा फौजफाटा जळगावातील सुप्रीम कॉलनीत दाखल झाला. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आरोपींच्या घरासमोर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली 2 दुकाने जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. कारवाई होत असताना परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

या प्रकरणात निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित या संशयित आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीतून ड्रग्ज पुरवठ्याची संपूर्ण साखळी समोर आली आहे. जळगाव शहरात कार्यरत असलेल्या एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झाला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने 3 जून 2026 रोजी रात्री कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापळा रचून लकी पाटील, रईस हारून देशमुख, तौसिफ आसिफ सय्यद आणि कुणाल पाटील यांना अटक केली आहे.

या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर ड्रग्ज पुरवठा आणि वितरणाच्या जाळ्याबाबत महत्त्वाचे माहीती पोलिसांना मिळाली आहे. या रॅकेटमधील 2 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके चौकशी करत आहेत. ड्रग्ज रॅकेटमधील अन्य संशयित आरोपींच्या मालमत्तांचीही तपासणी सुरू आहे. संबंधित ठिकाणी अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमणे आढळल्यास त्यांनाही नोटिसा बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जळगाव शहरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि ड्रग्ज प्रकरणामुळे जळगाव प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात अधिक तपास जळगाव गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment