दि.७ जुलै २०२६ ला असलेल्या “आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिना” निमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिवस
“आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिवस” दरवर्षी ७ जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश जगभरात सकारात्मक ऊर्जा पसरवणे आणि मानवांमध्ये आपापसातील प्रेम आणि सलोखा वृद्धिंगत करणे हा आहे. या दिवसाची सुरुवात द बीटल्स या जगप्रसिद्ध बँडचे माजी ड्रमर रिंगो स्टार यांनी २००८ मध्ये केली होती. ७ जुलै हा रिंगो स्टार यांचा वाढदिवस त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जगाकडे एक साधी मागणी केली की, प्रत्येकाने या दिवशी शांतता आणि प्रेमाचा विचार करावा. तेव्हापासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा होऊ लागला. हा दिवस साजरा करताना ७ जुलै रोजी आपापल्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ठीक १२:०० वाजता लोक एकत्र येतात किंवा जिथे असतील तिथे थांबतात. शांतता आणि प्रेमाचा संदेश देतात. दुपारी १२ वाजता सर्वजण आपल्या हाताने शांततेचे प्रतीक करून “Peace and Love” शांतता आणि प्रेम या शब्दांचा उच्चार करतात किंवा मनात आठवतात. या माध्यमातून संपूर्ण जगभरात सकारात्मकतेची एक साखळी तयार केली जाते.
आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात हा दिवस मानवी मनाला शांतता आणि आपुलकीची आठवण करून देतो .हा दिवस आपल्याला हे शिकवतो की प्रेम आणि शांतता हीच जगाची खरी आणि सार्वत्रिक भाषा आहे, जी कोणत्याही संस्कृतीच्या किंवा भाषेच्या पलीकडे आहे.लोकांमध्ये आपापसात आपुलकी वाढवणे, एकमेकांना मदत करणे आणि चेहऱ्यावर हसू आणणे हा यामागचा शुद्ध हेतू आहे. संयुक्त राष्ट्रांद्वारे (UN) साजरा केला जाणारा अधिकृत ‘आंतरराष्ट्रीय शांतता दिन’ हा २१ सप्टेंबर रोजी असतो तर ७ जुलैचा हा दिवस विशेषतः ‘शांतता आणि प्रेम’ या भावनेला समर्पित आहे .
शांततेची सुरुवात नेहमी एका छोट्या स्मिताने होते. मनाची शांतता हीच जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. जेथे वाद संपतात, तेथे खऱ्या शांततेचा जन्म होतो. शांतता म्हणजे प्रेमाची उपस्थिती होय. प्रेम ही अशी भाषा आहे, जी न बोलताही मनाला समजते. जगातील सर्वात सुंदर गोष्टी फक्त प्रेमानेच जिंकता येतात. दुसऱ्यांना आनंद देणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे हाच खरा धर्म आहे. प्रेम माणसांना जोडते, तर द्वेष माणसांना तोडतो. मनुष्य पृथ्वीला शांतता आणि प्रेमाने अधिक सुंदर बनवू शकतो; जेव्हा जगात प्रेमाची ताकद वाढेल, तेव्हा शांतता आपोआप नांदेल. द्वेषाचा अंधार दूर करण्यासाठी प्रेमाचा एक छोटा दिवा पुरेसा असतो.
शांततेविषयी तथागत गौतम बुद्ध म्हणतात की, “शांतता ही आतून येते, तिच्या शोधात बाहेर भटकू नका.”
महात्मा गांधी म्हणतात की ,”शांततेचा कोणताही मार्ग नसतो, शांतता हाच एकमेव मार्ग आहे.”
मदर तेरेसा शांततेविषयी म्हणतात की ,”जर आपल्यात शांतता नसेल, तर याचे कारण आपण हे विसरलो आहोत की आपण एकमेकांचे आहोत.”
स्वामी विवेकानंद म्हणतात की, “मनाची एकाग्रता आणि शांतता हीच सर्व शक्तींची गुरुकिल्ली आहे.”
दलाई लामा म्हणतात की, “जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल, तर आधी स्वतःच्या मनात शांतता निर्माण करावी लागेल.”
मनाची शांती हेच माणसाचे सर्वात मोठे धन आणि शक्ती आहे. वादळात जसे प्रतिबिंब दिसत नाही, तसेच अशांत मनात कधीही सत्य आणि योग्य मार्ग सापडत नाही. काही वेळा शब्दांपेक्षा मौन आणि शांत राहणे समोरच्याला योग्य उत्तर ठरते. शांतता जेथे तेथे प्रेम असते आणि प्रेम जेथे तेथे शांतता असते; म्हणून सर्वांनी आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिनी स्वतःच्या मनामध्ये शांतता आणि प्रेम निर्माण करून शांतता व प्रेमाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला पाहिजे.
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
महानुभाव ग्रंथोत्तेजक साहित्य
अलंकार पुरस्कार प्राप्त साहित्यिक,
अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत.






