अमरावती : भारत निवडणूक आयोगाने देशभर मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ घेण्याचे आदेश दिले आहेत. या ऐतिहासिक मोहिमेचा तिसरा टप्पा देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविला जात असून, यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. ‘एकही पात्र भारतीय नागरिक सुटणार नाही आणि एकही अपात्र नागरिक समाविष्ट होणार नाही’ या मुख्य उद्दिष्टाने हा देशव्यापी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख, तर अमरावती जिल्ह्यातील 25 लाख 45 हजार 677 मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष घरोघरी जाऊन खातरजमा करण्यात येणार आहे. मागील 24 वर्षांत केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण करण्यात आले असून सखोल पुनरिक्षण झाले नसल्याने, या काळात वाढलेले शहरीकरण आणि स्थलांतरामुळे मतदार याद्यांमध्ये दुबार नावे असण्याची शक्यता लक्षात घेऊन ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे आणि वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशासन सज्ज –
या मोहिमेची अमरावती जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघांमध्ये व्यापक यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. या कामासाठी 8 मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 170 अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 233 बीएलओ सुपरवायझर आणि 2,682 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व 2 हजार 682 बीएलओंचे 100 टक्के प्रशिक्षण पूर्ण झाले असून, 90.78टक्के मॅपिंगचे कामही झाले आहे. तसेच गणना अर्जाची 100 टक्के छपाई करून त्यांचे बीएलओ यांना वाटप करण्यात आले आहे.
घरोघरी भेटीचे वेळापत्रक –
या मोहिमेच्या वेळापत्रकानुसार, 20 ते 29 जून 2026 दरम्यान गणना अर्जांची छपाई व बीएलओंचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओ घरोघरी भेटी देऊन गणना अर्जांचे वाटप आणि संकलन करत आहेत. गृहभेटी दरम्यान घर बंद आढळल्यास संबंधित कुटुंबाला भेट देण्याचे किमान ३ प्रयत्न बीएलओ करणार असून, त्याची रीतसर नोंद ठेवली जाणार आहे. बीएलओ हे प्रामुख्याने शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वसुली लिपिक, ग्रामपंचायत कर्मचारी व कृषी सहायक या प्रवर्गातील आहेत. कामाची व्याप्ती लक्षात घेता या कर्मचाऱ्यांना दररोज दुपारी 2 वाजेनंतर केवळ ‘SIR’ च्या कामकाजासाठी कार्यमुक्त करण्याचे लेखी आदेश जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी विशेष नियोजन –
अनेक ठिकाणी शिक्षक बीएलओ म्हणून कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दि. 4 ते 19 जुलै 2026 या कालावधीत शाळांच्या वेळेमध्ये सकाळच्या सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. नियमित तासिका पूर्ण करून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), आयुक्त (महानगरपालिका) व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत. या संपूर्ण मोहिमेचा प्रभावी व कालमर्यादित आढावा घेण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दररोज सायंकाळी 6 वाजता व्ही.सी. द्वारे आढावा सभा घेतली जाते.
नागरिकत्वाचा पुरावा –
या मोहिमेदरम्यान जे मतदार ईएफ फॉर्म भरून बीएलओकडे देतील, त्या सर्वांची नावे दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदवता येतील. प्रारूप यादी प्रसिद्धीनंतर ज्या मतदारांची नावे मागील मतदार यादीतील नोंदींशी जुळत नाहीत किंवा विसंगती आढळली आहे, अशा मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावून सुनावणीअंती निर्णय घेतला जाईल. प्रारूप मतदार यादीत नावे समाविष्ट न झालेल्या व्यक्तींची यादी आणि त्याची संभाव्य कारणे स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालये आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील. विसंगतीमुळे नोटीस मिळालेल्या मतदारांना दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी फॉर्मच्या मागील बाजूस दिलेली असेल. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, आधार कार्डचा वापर केवळ ओळख पुरावा म्हणून केला जाऊ शकतो, नागरिकत्वाचा पुरावा म्हणून तो ग्राह्य धरला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
6 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात एकूण 8 लाख 10 हजार 410 (31.83%) गणना अर्जांचे वाटप झाले असून 98 हजार 629 (3.87 टक्के) अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मयत व्यक्तींची नावे कमी करणे आणि नवीन पात्र मतदारांचा समावेश करून मतदार यादी 100 टक्के अचूक व पारदर्शक करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय कार्यात पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीची तात्काळ नेमणूक करावी. पावसाळ्याच्या कठीण परिस्थितीतही सर्व बीएलओ घरोघरी जाऊन निष्ठेने पडताळणीचे काम करत असल्याने नागरिकांनी त्यांना अचूक माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे. या मोहिमेची अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल. मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह लोकशाहीसाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.






