दि .११ जुलै २०२६ रोजी असलेल्या “जागतिक लोकसंख्या दिना” निमित्त प्रा.अरुण बुंदेले यांच्या ‘निखारा‘ या काव्यसंग्रहातील ‘करा नियोजन‘ वऱ्हाडी कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
करा नियोजन…
भाऊ मायी सांगी हाय करा नियोजन ।
टाळा जीवंत मरन करा तुमी नियोजन ।।धृ.।।
अंगाले कपळा नाय, पोट्टेयले पाटी नाय ।
पाटी-लेखन-कपळे एकमेकाचे घेत हाय ।
बायकोलेबी काय सांगू,फाटके लुगळे हाय ।
मले त् इचारूच नोका,चोलनाच फाटला हाय ।
म्हून मायी सांगी हाय,करा नियोजन ।।१।।
संसार माह्या सुखी व्होते दोन लेकरं ।
कोनाले काय मिळत नाय झाले डझनभर ।
सिक्सनाइना लेकर हाय करूनी मरमर ।
कामय होत नाय बायकोच्यान तरतर ।
म्हून मायी सांगी हाय करा नियोजन ।।२।।
सरकार तरी म्हने मले कर नियोजन ।
तव्हाच तुह्य जाईन लेका सुखात जीवन ।
नियोजना इना जीवनाचे हाय मरन ।
लायन्या कुटुंबातले पोरं व्हईल महान ।
म्हून मायी सांगी हाय करा नियोजन ।।३।।
जवा तुमी दोन लेकराले जनम दयान ।
पाटी,पुस्तक कापळ सर्वेयले भेटनं ।
साक्षरतेचं परमान मंग लईच वाळनं ।
करा नियोजन टाळा जीवंत मरन ।
म्हून मायी सांगी हाय करा नियोजन ।।४।।
लेखक –
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
संत कबीर कवीराज पुरस्कार प्राप्त
कवी व अभंगकार, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
(‘निखारा’ या काव्यसंग्रहातून साभार)
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील असंख्य अश्या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






