अमरावती : मेळघाटातील दुर्गम व आदिवासी बहुल भागातील नागरिकांचा प्रवास सुकर व अधिक सोयीचा करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. हतरू परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद देत, परतवाडा आणि मोर्शी आगारातून सेमाडोह, रायपूर, हतरू या गावांकरिता नवीन बसफेऱ्या सुरू करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाने दिली आहे.
धारणी तालुक्यातील सेमाडोह, रायपूर, हतरू, रुईपठार आणि काजळडोह या भागात सकाळी आणि दुपारी अतिरिक्त बससेवेची आवश्यकता लक्षात घेऊन हतरू येथील सरपंच, उपसरपंच, महिला मंडळ व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या संदर्भात विनंती केली होती. नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या प्रकरणी सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देश परिवहन महामंडळाला दिले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे सहाय्यक अभियंता आणि आगार व्यवस्थापक (रा.प. परतवाडा) यांनी या मार्गाची संयुक्त पाहणी करून रस्ता सर्वेक्षण पूर्ण केले. या सकारात्मक सर्वेक्षणाअंती रस्त्याची सद्यस्थिती आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन महामंडळाने या मार्गावर तातडीने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार, प्रवाशांच्या सुविधेसाठी परतवाडा आगारातून दररोज सकाळी 8 वाजता सुटणारी बस सेमाडोह, रायपूर, हतरू मार्गे थेट रुईपठारपर्यंत धावेल. तसेच मोर्शी आगारातून दुपारी 2:30 वाजता सुटणारी बस (परतवाडा आगार सुटण्याची वेळ दुपारी 4 वाजता) सेमाडोह, रायपूर, हतरू मार्गे काजळडोह येथे पोहचेल व तेथे रात्रमुक्कामी असेल.
(स्रोत – जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.)
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.






