वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – जीवन शिक्षणाची बोधशाळा (भाग-४)

SHARE:

वंदनीय तुकडोजी महाराजांची गुरुपरंपरा…

हैबतीनाथ-मायबाई-अडकोजी-तुकडोजी अशी ही वं. महाराजांची गुरुपरमपरा सांगितली जाते.
“हैबती नाथ” –  सातारा जिल्ह्यातील आरफळ येथील पवार घराण्यातील हैबती नावाचा तरुण ग्वाल्हेरच्या सैन्यात भरती झाला. तो बारगीर असल्याने युद्ध असेल की त्याला स्वत: चा  घोडा व शस्त्र घेऊन लढाई करण्यासाठी जावे लागत असे. व युद्ध संपताच आपल्या घरी परत यायचे अशी पद्धत होती. एकदा ते परत येत असताना कात्रज घाटात त्यांना अडवून पेंढार्यांनी त्यांच्या जवळील चीजवस्तू लुबाडून घेतल्या व मारझोड करून एका गुहेत कोंडून ठेवले व गुहेच्या तोंडाशी भला मोठा दगड लावून ठेवला.

हैबती जरी सैनिक असले तरी त्यांचा देवधर्माकडे पहिलेपासून ओढा होता. त्यांच्या घराण्यात संतज्ञानेश्वर भक्तीची परंपरा होती. त्यांनी रातभर गुहेत कोंडलेल्या अवस्थेत असताना विचार केला की, आपण आपल्या आयुष्यभर कधीच कोणाचे वाईट केले नाही. मग अशी विचित्र घटना आपल्या बाबतीत का घडावी. अशा अवस्थेत त्यांनी संत ज्ञानेश्वरांचा धावा केला आणि चमत्कार असा झाला की, दिवस निघताच गुहेच्या तोंडावरील भला मोठा दगड दूर झाला.

या घटनेनंतर हैबती यांनी आपल्या घरी न जाता आळंदीलाच जावे असे ठरविले आणि ते आळंदीला गेले. आळंदीलाच संत  ज्ञानेश्वर समाधीच्या परिसरात वास्तव्यास राहिले. त्यांना ज्ञानेश्वरांचा कृपया प्रसाद मिळाला आणि हैबती चे ते हैबती नाथ झाले. हैबतीनाथ झाल्यावर त्यांना दैवी अनुभवाची प्रचिती येऊ लागली. याच हैबती नाथांनी संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी पंढरपुरी नेण्याचा प्रघात सुरू केला. याच हैबती नाथांची समाधी आळंदीला संत ज्ञानेश्वर माउलींच्या  समाधी समोर बांधलेली आहे.

या वारीतूनच पंढरपुरास आर्विवरून येणाऱ्या संत मायबईची भेट घडून आली. परिचय झाला..मायबाईना वार करी पंथाची दीक्षा हैबती नाथांनी दिली. माय बाईना कृपया प्रसाद प्राप्त झाला.

श्री संत मायबाई – मायबईचे माहेरचे नाव भागुबाई. अमरावती जिल्ह्यातील शिरखेडच्या देशपांडेंच्या त्या सुकन्या. त्यांचे लग्न कुरहा गावातील सितारामपंत पांडे सोबत झाले. मायबाई कधीकधी वेडसरपणे वागत. त्यामुळे सासरी त्यांना त्रास व्हायचा. सीताराम पंतांना हा त्रास पाहवत नसल्याने त्यांनी आर्विला आनंद विष्णुजी कडे मुनिमजिंची नोकरी पत्करली. मायबाईचा संसार कसाबसा चालू होता. सितरामपंत धार्मिक व संतमार्गी होते. ते वरुडच्या बगगाजी महाराजांचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी मायबईला हळूहळू धार्मिकतेचा वळण लावले. त्या अखंड हरिनाम जप करू लागल्या. या नामजापामुळे त्यांच्यात, त्यांच्या वागण्या बोलण्यात व्यवहारात परिवर्तन झाले आणि त्यांना भक्तिमार्गाची ओढ लागली. दरवर्षी त्या पंढरपूरच्या वरील जाऊ लागल्या. पुढे पती व एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर त्यांच्यावर पूर्णतः विरक्ती आली. त्यांनी मठ स्थापन करून आपल्या मठात आंधळे, पांगळे, गरीब, भिकारी यांचे करिता अखंड अन्नछत्र चालविले.

त्या दररोज भिक्षा मागत असत. त्यातील काहीच शिल्लक ना ठेवता सर्वांचे अन्नदान करीत असत. त्या कीर्तन प्रवचन करू लागल्या. त्यांच्या वानित सिद्धता आली. त्यांच्या बाबतीत खूप चमत्कार सांगितले जातात. त्यांनी चंद्रपूर येथील मेलेली म्हैस जिवंत केली. चंद्रपूर येथे मायबाईची बंगई आहे. ती न हलविता हालते. आर्वित धुम्र पानी पंचाग्रही ने वडाच्या झाडाला स्वतःला उलते टांगून घेतले. मायबईने त्याला तसे न करण्यास सांगितले असता तो अपशब्द बोलला.. तेव्हा त्या परत फिरताच वडाचे झाड पूर्णपणे उन्मळून पडले. त्यात त्याचा करूण अंत झाला. आर्वितील जोशी यांना ६० व्या वर्षी माय बाईंच्या कृपेने मूल झाले. एकदा मठात तूप कमी पडले असता माय बाईंने हरी हरी जप केला. तेव्हा एका गाडीवानाने गुप्तपणे तुपाचे डबे मठात आणून पोचवले. माय बाईला हे कळताच त्या साश्रू नयनांनी म्हणाल्या, “हरी हरी माझी लाज राखलीस देवा, व चूप चूपचाप पळून ही गेलास. आणि त्या भजन करता बसल्या. जीवनभर त्यांनी परोपकार व परपिडा निवारण करून १९१४ साली जगाचा निरोप घेत समाधी घेतली.

मायबाईंच्या दर्शनासाठी माधानचे प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज आले होते. त्यांनी मायबाईंचा महिमा पुधी प्रमाणे लिहिला आहे.
“जे न दिसे विकासे येणे करुनी महा रवीच्या ll 
ते ब्रहमची दाखविती वंदू त्या मायबाईं आर्वीच्या !!”
(उर्वरित पुढील अंकी, आधार गुरूदेव पुष्पांजली, श्री गं. बा. टप्पे)

 

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासक, अमरावती. 

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा