श्रीराम नाम चाले घोषु, तो धन्य देशु, धन्य दिवसु…..

SHARE:

विचार संपदा…

राम जानकी जीवन, योगियांचे निज ध्यान.. 
राम राजीव लोचन, तुका चरण वंदिती…….

कर्तव्यनिष्ठा हे श्रीरामाचे जीवनध्येय होते. रामायणात देव म्हणून श्रीरामाचे चरित्र नाही, तर जीवन प्रवासात येणाऱ्या अनेक आपदा सोशित, कर्तुत्वाने देवत्व प्राप्त झालेले, ते महान व्यक्तिमत्व होते. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ..ह्या श्रीमद् भगवद् गीता उक्तीप्रमाणे त्यांचा जन्म झाला, ही सबंध भारत वासियांची भाव श्रद्धा आहे.

आदर्श सामाजिक दिव्य गुणी असे कुटुंब जीवन आणि श्रेष्ठतम नीती मूल्य वर्धिष्णू करण्याचे कार्य श्रीरामांनी केल्याचे प्रतीत होते. श्रीराम चरित्रामुळे आपला भारत देश भाग्यशाली झालेला आहे. सद्गुणांचा सुंदर समुच्चय असलेले श्री. रामचरित्र आदर्शवत सामाजिक सद्गुण, श्रेष्ठतम जीवनमूल्यांचे प्रेरणादायी स्थान आहे. श्रीराम प्रभू चरित्राचा हेतू लोक मंगल आणि लोकोत्तर असाच आहे. सीतामाईला रावणाने पळवून नेल्यानंतर, श्री.रामराय खूप शोक करतात. झाडांना मिठी मारतात वृक्षवेलींना विचारतात.. वृक्ष लतांनो सांगा कोणीतरी, आले का वन बघण्याला.. माझे राम प्रभू तुम्हाला दिसले काय..

श्रीरामाने असा शोक करणे साहजिकच आहे. पण श्रीराम राय असा शोक करीत बसले असते तर, श्रीरामाला कोणी श्रीराम म्हटले नसते. शोक करणाऱ्या श्रीरामाचे श्रेष्ठपण अशात आहे की, श्री रामरायाने आपले कर्तव्य कर्म पार पाडले. रावणाला ठार मारून, सीतामाईची सुटका केली. रामरायाला ईश्वराचे पूर्ण अवतार मानले आहे. श्रीराम खऱ्या अर्थाने महापुरुष होते. श्रीरामाच्या ठिकाणी असलेला प्रत्येक सद्गगुण स्पृहणीय होता. उत्कृष्ट कर्मयोगी राजा आणि उत्कृष्ट योद्धा संकटाला न घाबरणारा युगपुरुष रामराजा होते. म्हणूनच महर्षी वाल्मिकींनी महाकाव्यात आपत्ती आणि आघात सहन करता करता, देवत्व प्राप्त केलेली व्यक्तीं असे वर्णन केलेले आहे.

टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देवपण मिळत नाही हे या चरित्रावरून कळून येते. रावणाच्या वधानंतर देवत्व दाखविण्याचा जेंव्हा प्रसंग आला, त्यावेळी सर्व देवगण श्रीरामाची स्तुती करतात ..प्रभू तुम्ही विश्वचालक भगवान आहात. परंतु त्यावेळी श्रीराम म्हणतात, आत्मानम् मानुष्यम् मन्ये, राम दशरथात्मजम्..  सुमारे पाच हजार वर्षाच्या वर वर्ष होऊन गेली, तरीही श्रीराम कथेचे सौंदर्य त्यातील जिवंतपणा त्यातील भक्तीयुक्त सौरभ हा पूर्वीसारखाच टिकून आहे, हे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.  रामरायाच्या जीवनात भावना आणि कर्तव्य यांचा सतत संघर्ष चालत आलेला आहे, परंतु कर्तव्यनिष्ठता हेच त्यांचे जीवन राहिले आहे.

अलौकिक व्यक्तिमत्व, अभिजात नेतृत्व आणि स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा यांचा त्रिवेणी संगम श्रीराम चरित्रात असल्याने, रामायणातील प्रत्येक विचार हा श्रेष्ठतम दिसून येतो. ज्यावेळी धर्माला ग्लानी येथे अधर्म वाढतो, त्यावेळी पाशवी वृत्तीच्या निर्दालनासाठी श्रीराम येतात ही भारतीय संस्कृतीची निष्ठा आहे. संपूर्ण देशात रामराज्य होण्यासाठी आम्ही आक्रोश करतो, परंतु श्रीराम रायाच्या जीवनातील आदर्श आम्ही केव्हा घेणार.. त्यावर चिंतन करणे आवश्यक आहे. प्रेम भावे तुम्ही नाचा, राम रंगी रंगो वाचा.. संत निळोबाराय म्हणतात, भारत देश खरोखरच धन्य आहे कारण… राम नाम चाले घोषु, तो धन्य देशु, धन्यदिवसू…

..श्रीराम प्रभूच्या जीवनातील विविध प्रसंगातील उदात्त जीवनधारा संस्कारित अशीच आहे. श्री राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला अयोध्येचे राज्यपद हा कैकयीचा प्रस्ताव राजा दशरथाजवळ आला. राजा दशरथ मनाने दुःखी झाले. श्री. रामरायाला कळताच, कोणत्याही प्रकारची आंतरिक व्यथा व्यक्त न करता, त्यांनी तो प्रस्ताव स्वीकार केला. श्रीराम रायाचा हा विचार भारतीय संस्कृतीच्या ग्रंथात नोंदविल्या गेला आहे. रावणाच्या मृत्यूनंतर त्याचा अग्निसंस्कार करण्यास बिभीषण नकार देतो त्यावेळी प्रभू त्याला समजावून सांगतात बिभीषणा ..मरणाबरोबर वैर संपत असते. रावणवधानंतर लंकेचे राज्य बिभिषणाला देतात आणि कोणत्याही प्रकारचा मोह न धरता अयोध्याकडे परत येतात. निर्मोही पणाचे हे विश्वातील श्रेष्ठ ज्वलंत उदाहरण आहे.

खूप काही प्रसंग आहेत. रामायणाचे सार महर्षी वाल्मिकींनी स्पष्ट केलेले आहे. रामायणातील प्रत्येक आदर्श जीवनात आणण्याचा प्रयत्न करा, पती-पत्नीत रामसितेसारखा स्नेहबंध निर्माण व्हावा, बंधुता वाढावी आणि आपणही आचार विचाराच्या दृष्टीने राम होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवावे. प्रचलित प्रदूषित अशा स्थितीत, श्रीरामरायाचा जीवन संदेश वाढविण्याचा प्रयत्न व्हावा असे मनोमन वाटते. श्री. रामरायाचे चिंतन सदैव मुखात असावे. आपणाला अनुभूती येईल.. श्रीराम राय ज्यांना कळले, त्यांना परमार्थाची आस निर्माण होते आणि मग संपत्तीचा हव्यास सुटून, त्याला भक्तीचा ध्यास लागून त्याच्या प्रत्येक कर्माला सुवास येतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
मनी धरावे ते होते, 
विघ्न अवघे नासूनी जाते,
कृपा केली रघुनाथे, प्रचिती येते….

 

लेखक –
डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शेगाव.
संपर्क – ९४०४५५३५०५

डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे
Author: डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे

लेखक डॉ. ज्ञानेश्वर भानुदास मिरगे, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील, से. नि. शिक्षण केंद्रप्रमुख असून, संत साहित्याचे व्यासंगी उपासक आहेत. महाराष्ट्रातील विविध दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रे, मासिके आणि वार्षिक अंकात त्यांचे ४५० लेख प्रकाशित झाले आहेत. संत साहित्याचे मंथन करून, शब्दांकित केलेला चिंतन ग्रंथ ही प्रकाशित झालेला आहे. सखाश्री आध्यात्मिक साहित्य मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा प्रदान केलेली आहे. त्यांचे साहित्य लेखन सेवा कार्यआजही सातत्याने सुरूच आहे. एम. ए. एम. एड् साहित्य विशारद, पीएच.डी. उच्च पदवी प्राप्त मिरगे सर, उत्कृष्ट किर्तन प्रवचन कार असून, त्यांनी विदर्भ क्षेत्रात गेल्या ४० वर्षात, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, ५०० च्या वर कीर्तन, प्रवचन सेवेचे कार्यक्रम सादर केले आहेत. शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार २००१, महामहिम राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते, त्यांना प्राप्त झाला असून, भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. शिक्षण, साहित्य, सामाजिक सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल, महाराष्ट्र शासन, विविध सेवाभावी संस्था, समाज मंडळांच्या वतीने, एकूण १८ दर्जेदार पुरस्कारांनी ते गौरवान्वित आहेत.. महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा, उत्कृष्ट लेखन कार्याचा दर्जेदार, अध्यात्मिक वांग्मय पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. विनम्र, सेवाभावी, गुणवंत, प्रज्ञावंत, उत्कृष्ट अध्यापक म्हणून ते आजही समाजप्रिय आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा